वणी :
शेतकरी व कामगार नेते तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव संजय खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार, दि. 23 मे 2026 रोजी वणी येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिवसभर होणाऱ्या या कार्यक्रमांमधून सामाजिक बांधिलकी जपत समाजोपयोगी संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
सकाळी 10.30 वाजता शेतकरी मंदिर, वणी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” हा संदेश देत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात अपघात, शस्त्रक्रिया तसेच विविध आजारांमुळे रक्ताची आवश्यकता सातत्याने भासत असते. एका व्यक्तीच्या रक्तदानातून अनेकांचे प्राण वाचू शकतात, या सामाजिक भावनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
दुपारच्या सत्रात वणी येथील वृद्धाश्रमात गरजूंना उपयुक्त साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. समाजातील ज्येष्ठ नागरिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला असून, त्याचबरोबर ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळवाटपाचाही कार्यक्रम होणार आहे.
संध्याकाळी 6 वाजता डीएसके कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स या व्यावसायिक कार्यालयाचे उद्घाटन खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते शहरातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी शिक्षणमंत्री वसंतराव पुरके राहणार आहेत. संजय खाडे यांचे चिरंजीव धनंजय खाडे हे या कार्यालयाचे संचालक आहेत. सामाजिक कार्यासोबतच विकासाभिमुख उपक्रमांना चालना देण्याच्या उद्देशाने हा नवीन व्यावसायिक उपक्रम सुरू करण्यात येत आहे.