वणी :
वणी नगरपरिषद सेवानिवृत्त कर्मचारी बहुउद्देशीय संघटना, वणी यांच्या वतीने १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त संताजी इंग्लिश मीडियम स्कूलच्या सभागृहात वणी नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक, पदाधिकारी तसेच मागील तीन वर्षांत सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
शिक्षण प्रसारक मंडळ वणीचे अध्यक्ष तथा वणी नगर परिषदेचे माजी अध्यक्ष श्री विजय मुकेवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्षा सौ. विद्याताई आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी अरविंद सालकाडे यांच्या मंत्रोच्चारात कलशपूजन, नगरपरिषद प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाला स्थानिक आमदार संजय देरकर, माजी आमदार संजिरेड्डी बोदकुरवार, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू भालचंद्रजी चोपणे, मुख्याधिकारी डॉ. सचिन गाडे यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी माजी नगराध्यक्षा सौ. शालिनीताई रासेकर, साधनाताई गोहकार, पांडुरंग टोंगे, माजी उपाध्यक्ष ओमप्रकाश चचडा, पुरुषोत्तम पाटील, रमेश येरणे, कीर्तीताई देशकर तसेच माजी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
यावेळी वणी नगरपरिषदेचे विद्यमान १९ नगरसेवक व पदाधिकाऱ्यांसह सहा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन नागरी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात मान्यवरांनी शहराच्या विकासासाठी लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी यांच्यात समन्वयाचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मनोगत संघटनेचे अध्यक्ष नरेंद्रजी तराळे यांनी केले. त्यांनी नगरपरिषदेच्या पूर्वीच्या कार्यपद्धतीतील समन्वय, विकासकामे व सेवा सुविधांचा उल्लेख करत विद्यमान पदाधिकारी व अधिकाऱ्यांनीही शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे कार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन अभय पारखी यांनी केले. विजय गंधेवार यांनी महाराष्ट्र गीत, संघटनेचे उद्देशगीत व पसायदान सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. आभार प्रदर्शन संघटनेचे कोषाध्यक्ष अनिल कांबळे यांनी केले.