वणी :
शहरातील दीपक चौपाटी परिसरात सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या अवैध वरली मटका जुगारावर वणी पोलिसांनी धाड टाकून दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत रोख रकमेसह जुगारासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोहेकॉ/ अविनाश वामनराव चिकराम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अब्दुल शब्बीर अब्दुल रहेमान (वय 57, रा. मोमिनपुरा, वणी) व अशीद खान अजहर उल्ला खान (वय 37, रा. गुरुनगर, वणी) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) तसेच बीएनएस कलम 49 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. 18 मे 2026 रोजी दुपारी साडेदोन वाजताच्या सुमारास दीपक चौपाटी नगर, नगरपरिषद कॉम्प्लेक्सजवळ सार्वजनिक ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. यावेळी आरोपी अब्दुल शब्बीर हा लोकांकडून पैसे घेऊन वरली मटक्याचे आकडे लिहिताना पोलिसांना आढळून आला. पंचासमक्ष करण्यात आलेल्या कारवाईत त्याच्याकडून मटका आकडे लिहिलेले पट्टी बुक, कार्बन तुकडा, पेन तसेच खिशातील 2 हजार रुपयांची रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
चौकशीदरम्यान आरोपी अब्दुल शब्बीर याने सदर मटका व्यवसायाचा मालक आरोपी अशीद खान असल्याचे सांगितले. तसेच आपण त्याच्याकडे रोजंदारीवर काम करत असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.