वणी :
वेकोलि प्रकल्पबाधितांच्या समस्या गंभीर आहेत. पुनर्वसन झाले तरीही त्यांच्या समस्या सुटल्या नाहीत. त्या सोडवण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला. सर्व गावकऱ्यांनी त्यात सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केला. न्याय मिळवून देण्यासाठी ते गावकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे म्हणालेत. जर आंदोलन थांबवण्यासाठी कोणाचाही दबाव आला तरीही, हे आंदोलन थांबणार नाही असा इशारा त्यांनी दिला. वेकोलि प्रकल्पबाधितांच्या समस्या जाणून घेण्यासाठी विधानपरिषद सदस्य तथा प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांचा वणी दौरा आखला. यावेळी भालर वसाहतीनिजकच्या बोरगाव पुनर्वसनातील कार्यक्रमात ते बोलत होते. प्रहार संघटनेचे वणी विधानसभा अध्यक्ष सतीश देरकर, प्रहार शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुवीर कारेकर ह्यांनी ह्या कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यावेळी विचारपीठावर प्रहारचे महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख प्रवीण हेंडवे, शिवसेना लोकसभा संपर्कप्रमुख मुकेश जीवतोडे उपस्थित होते.
बच्चू कडू यांनी सर्व औपचारिकता टाळत प्रकल्पबाधितांशी थेट संवाद साधला. गावातील कुटुंबं, शेतमालक, नोकरदार ह्यांची माहिती घेतली. पुनर्वसनाचा विषय त्यांनी गांभीर्याने घेतला. बोरगावमध्ये पिण्याचे पाणी, नियमित वीज, रस्ते, बेरोजगारी अशा अनेक समस्या असल्याचे प्रकल्पबाधितांनी सांगितले. युवकांनी कायमस्वरूपी रोजगाराची अपेक्षा व्यक्त केली. ह्या समस्यांचं निराकरण झालं नाही तर खाणीच बंद करण्याची ताकीद बच्चू कडू ह्यांनी दिली. त्यासाठी १८ ऑक्टोबरच्या रात्रीपासूनच खाणीत आंदोलन करण्याचा इशारा कडू ह्यांनी दिला. हे आंदोलन दाबण्यासाठी कोणताही दबाब आला तर तो सहन करणार नसल्याचेही ते म्हणालेत. कार्यक्रमाचे संचालन सुनील इंदुवामन ठाकरे ह्यांनी केले. समस्या पाहणीच्या ह्या दौऱ्यात राकेश उरकुडे, संजय मडावी, विवेक वाघमारे, विठ्ठल विरुटकर, श्याम उईके, योगेश पोटे, रमेश मंगाम, नागेश पाझारे, मुरधीधर खोकले, कुंदन मडावी आणि अनेक कार्यकर्यांनी मोलाची कामगिरी बजावली.