वणी :
खरीप हंगाम तोंडावर असताना शेतकरी मशागत व खत-बियाणे खरेदीच्या तयारीत व्यस्त असतानाच, वणी उपविभागात कृषी केंद्र चालकांकडून ‘लिंकिंग’च्या नावाखाली शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरू असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वणी तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी उपविभागीय अधिकारी (SDO) यांना निवेदन सादर करून तातडीने कडक कारवाईची मागणी केली आहे.
शेतकऱ्यांकडून मिळालेल्या तक्रारीनुसार, अनेक कृषी केंद्रांवर “आमच्याकडून बी-बियाणे घेतल्याशिवाय खत मिळणार नाही” अशी अट घालण्यात येत आहे. तसेच DAP, युरिया यांसारख्या आवश्यक खतांसोबत अनावश्यक व बोगस टॉनिक, कीटकनाशके किंवा दुय्यम दर्जाची खते खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप आहे. काही ठिकाणी खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करून जादा दराने विक्री करण्याचे प्रकारही सुरू असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मनसेने प्रशासनाकडे काही ठोस मागण्या केल्या आहेत. यामध्ये वणी उपविभागातील सर्व कृषी केंद्रांची तातडीने तपासणी करण्यासाठी भरारी पथके नेमणे, ‘लिंकिंग’ची सक्ती करणाऱ्या दुकानदारांचे परवाने तात्काळ रद्द करणे व त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करणे, तसेच प्रत्येक कृषी केंद्राबाहेर उपलब्ध खतसाठा व शासकीय दर (MRP) दर्शविणारा फलक लावणे अनिवार्य करणे, या मागण्यांचा समावेश आहे.
दरम्यान, येत्या ८ दिवसांत याबाबत ठोस कार्यवाही न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालय तसेच संबंधित कृषी केंद्रांवर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा फाल्गुन गोहोकार यांनी दिला आहे. या आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीस प्रशासन जबाबदार राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
निवेदन देताना शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष रमेशजी पेचे, गोविंदराव थेरे, विलन बोदाडकर, विठ्ठल हेपट, रवि आगसकांडे, लक्ष्मण उपरे, दिनेश डोंगे, मारोती पडवे, मंगेश झाडे, खुशाल पानघाटे, गौरव काकडे, कुणाल पायघन, राहुल बोधाने यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.
हे निवेदन जिल्हाधिकारी यवतमाळ, जिल्हा कृषी अधिकारी तसेच पोलीस ठाणे वणी यांनाही माहितीसाठी पाठविण्यात आले आहे.