वणी :
विठ्ठलवाडी येथे गुरुदेव सेवा मंडळ चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती “ग्रामजयंती” म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ग्रामगीतेच्या ओव्या आणि राष्ट्रसंतांच्या विचारांनी संपूर्ण परिसरात प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाची सुरुवात घटस्थापना, सामुदायिक ध्यान, प्रार्थना, भजन व कीर्तनाने करण्यात आली. यामुळे परिसरात भक्तिमय वातावरणाची अनुभूती मिळाली. ग्रामस्थांच्या ओठांवर नामस्मरण आणि अंतःकरणात राष्ट्रसंतांच्या विचारांची ज्योत प्रज्वलित झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
ग्रामजयंतीनिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. उत्कृष्ट वारली चित्रकार तथा पोलीस निरीक्षक शेखर वांढरे, व्यसनमुक्ती व स्वच्छता अभियानात कार्यरत राम झिले, गजानन देवगडे आणि संतोष खिरटकर यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व ग्रामगीता भेट देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी ग्रामगीताचार्य वैजनाथ खडसे, विजया दहेकर, गुणवंत पचारे आणि ह.भ.प. शरद वैद्य यांनी “गावा गावाशी जागवा, भेदभाव समूळ मिटवा, उजळा ग्रामोन्नतीचा दिवा” या राष्ट्रसंतांच्या विचारांना उजाळा देत ग्रामविकासाचा संदेश दिला.
सत्कारमूर्ती शेखर वांढरे यांनी भावना व्यक्त करताना, “हा सन्मान माझा नसून समाजासाठी कार्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या कार्याचा गौरव आहे,” असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा प्रचारक मारोती ठेंगणे होते, तर राजेंद्र कोरडे अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाला ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
सूत्रसंचालन ग्रामगीताचार्य वैजनाथ खडसे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रमोद राजुरकर, हरीभाऊ भट, पुंडलिक धोबे, संजय खाडे, लक्ष्मण जुमनाके, ज्ञानेश्वर कडुकर, भय्याजी तेजे, भास्कर पत्रकार, बाबाराव कुडमेथे, देविदास शेटे, शंकर किनाके, प्रभा आसेकर, शारदा बलकी, संगीता पेंदोर, रज्जू पारखी, सिंधु गिरडकर, बेबी दानव, रूंदा पाटेकर, नाना बदखल, मनोहर झाडे तसेच गुरुदेव उपासकांनी विशेष सहकार्य केले.