📰 धुळीच्या वादळाने वणी हादरले! प्रदूषणाच्या धोक्यावर नागरिकांमध्ये चिंता वाढली🌪️ “आजचं वादळ म्हणजे इशारा” — नगरसेवक अजय धोबे यांचे प्रशासनाला आवाहन

वणी :

शहरात आज संध्याकाळी सुमारे ८ वाजताच्या सुमारास आलेल्या अचानक वादळाने संपूर्ण वणी शहर व लगतच्या ग्रामपंचायत परिसरात धुळीचे ढग पसरले. काही क्षणांतच वातावरण धूसर झाले असून नागरिकांना श्वास घेणेही कठीण झाले. या घटनेमुळे शहरातील वाढत्या वायू व धूळ प्रदूषणाचा गंभीर मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
नगरसेवक अजय धोबे यांनी याबाबत तीव्र चिंता व्यक्त करत ही घटना केवळ नैसर्गिक नसून मानवनिर्मित कारणांमुळे अधिक गंभीर झाल्याचे सांगितले. शहरालगत असलेल्या रेल्वे कोळसा सायडिंग (Coal Siding) व कोल डेपोमधून उडणारी कोळशाची धूळ हे प्रदूषणाचे प्रमुख कारण ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.
वादळी वाऱ्यांमुळे ही कोळशाची धूळ संपूर्ण शहरात पसरत असून नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होत आहे. विशेषतः दमा, अ‍ॅलर्जी व श्वसनविकारांच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.
याशिवाय अपूर्ण रस्ते, उघडी बांधकामे, मुरूमाचे ढिगारे व हरित पट्ट्यांची कमतरता यामुळेही धूळ प्रदूषणाची समस्या अधिक तीव्र होत असल्याचे दिसून येत आहे.

🔴 तातडीच्या उपाययोजना करण्याची गरज - अजय धोबे

रेल्वे कोळसा सायडिंग व कोल डेपो येथे नियमित पाणी फवारणी, कोळशाच्या साठ्यावर ग्रीन नेट/कव्हर अनिवार्य करणे,कोळसा वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कव्हर बंधनकारक,
शहरातील रस्त्यांवर नियमित पाणी फवारणी,
मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण व हरित पट्टे विकसित करणे, प्रदूषण नियंत्रणासाठी प्रशासनाकडून कडक कारवाई करावी.

नगरसेवक अजय धोबे यांनी प्रशासन, उद्योग व नागरिकांनी एकत्रितपणे जबाबदारी स्वीकारून या समस्येवर ठोस उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.
“आजचं वादळ हा इशारा आहे… आता तरी जागे होऊया आणि आपल्या वणीला प्रदूषणमुक्त करूया!”
असे भावनिक आवाहन त्यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post