मारेगाव / उमरखेड :
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मारेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल असलेल्या चोरी प्रकरणाचा छडा लावत मुख्य आरोपीला अटक करण्यात यश मिळवले आहे. या कारवाईत एकूण २१ लाखांपेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गुन्ह्यात दोन विधीसंघर्ष बालकांसह एकूण चार आरोपींचा सहभाग निष्पन्न झाला आहे.
दि. २१ एप्रिल २०२६ रोजी दाखल अप.क्र. १४२/२०२६ अन्वये गुन्हा उघडकीस आणण्यात आला होता. मात्र, नब्यु नागू कुरकुटे (वय ३०, रा. मोहदरी, ता. उमरखेड, जि. यवतमाळ) हा आरोपी फरार होता. त्याच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेची पथके सातत्याने प्रयत्नशील होती.
दरम्यान, दि. १ मे २०२६ रोजी पुसद–उमरखेड मार्गावरील कोपरा फाटा परिसरात आरोपी असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर पथकाने सापळा रचून भारत सिकर यांच्या दुकानासमोरून संशयितास ताब्यात घेतले. चौकशीअंती त्याने आपली ओळख नब्यु नागू कुरकुटे अशी सांगितली.
आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले. पुढील चौकशीत त्याने दत्ता कुरकुटे (रा. नागवाडी) व दोन अल्पवयीनांच्या मदतीने सुमारे दोन महिन्यांपूर्वी मारेगाव येथे घरफोडी केल्याची कबुली दिली.
तपासादरम्यान हा मुद्देमाल मारेगाव येथील अप.क्र. १६०/२०२६ (घरफोडी) गुन्ह्यातील असल्याचे स्पष्ट झाले. जप्त करण्यात आलेल्या दागिन्यांची किंमत सुमारे ९,३०,३०८ रुपये इतकी असून आरोपीसह मुद्देमाल पुढील तपासासाठी मारेगाव पोलीसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता व अपर पोलीस अधीक्षक अशोक बोराट यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चव्हरे यांच्या नेतृत्वात पार पडली.
पथकात सपोनि दत्ता पेंडकर, पोउपनि/ धनराज हाके तसेच पोलीस अंमलदार सुनिल खंडागळे, सुधीर पांडे, सुभाष जाधव, संतोष भोरगे, तेजाब रणखांब, रजनिकांत मडावी आणि चालक सतीश फुके यांचा समावेश होता.