“विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची संस्कृती रुजवणे ही काळाची गरज” — संजीवरेड्डी बोदकुरवार

वणी :

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत वाचनाची संस्कृती दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. बालकांवर संस्कार घडवण्याची जबाबदारी असलेल्या पालकांच्या हातात पुस्तकाऐवजी मोबाईल दिसत असल्याने मुलांमध्ये वाचनाची सवय कमी होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची संस्कृती रुजवणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन माजी आमदार तथा नगर वाचनालयाचे अध्यक्ष संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केले.
नगर वाचनालय, वणी यांच्या वतीने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ मे रोजी ‘बालवाचन सप्ताहा’ची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमात उद्घाटक म्हणून बोदकुरवार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वणी येथील विदर्भ साहित्य संघाचे सचिव प्रा. अभिजित अणे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून स्नेहलता चुंबळे, सुनील वाटेकर व वैजनाथ खडसे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात स्नेहलता चुंबळे यांच्या महाराष्ट्र गीत व बालगीताने झाली. यानंतर उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून देत त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वाचनाची गरज अधोरेखित केली.
अध्यक्षीय भाषणात प्रा. अभिजित अणे यांनी बोधप्रद कथा सांगत ‘वाचाल तर वाचाल’ हा संदेश विद्यार्थ्यांना दिला. १ ते ७ मे दरम्यान चालणाऱ्या या बालवाचन सप्ताहात विद्यावाचस्पती स्वानंद पुंड, डॉ. सुवर्णा चरपे, शेखर वांढरे, स्नेहलता चुंबळे, सुनील वाटेकर, वैजनाथ खडसे, प्रवीण सातपुते यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाचनालयाचे सचिव गजानन कासावार यांनी केले, तर आभार प्रदर्शन संचालक अर्जुन उरकुडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवेंद्र भाजीपाले, प्रमोद लोणारे, राम मेंगावार व कल्पना राठोड यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post