वणीमध्ये सामाजिक न्याय विभागाच्या निर्णयाविरोधात निवेदन सादर

वणी (प्रतिनिधी):

राष्ट्रीय चर्मकार महासंघ, जिल्हा यवतमाळ यांच्या वतीने नुकतेच वणी येथील उपविभागीय कार्यालयात विविध मागण्यांसंदर्भात निवेदन सादर करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने घेतलेल्या अलीकडील निर्णयांविरोधात यावेळी आक्षेप नोंदवण्यात आले.
महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन अनुसूचित जातींमधील आरक्षणाच्या प्रस्तावित उपवर्गीकरण प्रक्रियेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. या प्रक्रियेत सर्व घटकांना समान न्याय मिळावा, तसेच समित्यांच्या अहवालात पारदर्शकता ठेवावी, अशी ठाम मागणी करण्यात आली.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, संबंधित समित्यांच्या अहवालाबाबत अद्याप स्पष्ट माहिती उपलब्ध नसून समाजातील सर्व घटकांचा सहभाग नसल्याची खंतही व्यक्त करण्यात आली. आर्थिक निकष, सामाजिक स्थिती आणि विविध घटकांचा सखोल विचार करूनच निर्णय घ्यावा, असेही निवेदनात नमूद आहे.
यावेळी महासंघाचे मार्गदर्शक गोसावी खोले साहेब, संत रविदास समाज सुधार मंडळ वणीचे अध्यक्ष राजू वाघमारे, जिल्हाध्यक्ष महेश लिपटे, वणी शहर अध्यक्ष सचिव दीपक हांडे, श्याम गिरडकर यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. शासनाने न्याय्य व सर्वसमावेशक निर्णय घ्यावा, अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post