वणी :
शहरातील मोक्षधाम परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली. मारोती नामदेव पिपराडे (वय ५०, रा. मानकी ह.मु. वणी) यांचा मृतदेह बुधवारी सकाळी सुमारे ९ वाजताच्या सुमारास मोक्षधामजवळील विसावा परिसरातील नालीत आढळून आला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पाहता पाहता घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. पुढील तपासासाठी मृतदेह शवविच्छेदनाकरिता वणी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. शवविच्छेदनानंतर दुपारी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
मृत मारोती पिपराडे हे मुळ मानकी येथील रहिवासी असून सध्या वणीतील गुरुनगर येथे वास्तव्यास होते. मंगळवारी ते आपल्या मूळ गावी जाण्यासाठी निघाले होते, अशी माहिती कुटुंबीयांकडून मिळाली आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. कुटुंबाचा एकमेव आधार हरपल्याने पिपराडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, सायंकाळी ५ वाजता वणी येथील मोक्षधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पोलिसांकडून मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.