वणी /
वणी शहरातील प्रभाग क्रमांक ८ मधील विविध नागरी समस्यांकडे लक्ष देत नवनिर्वाचित नगरसेविका सौ. प्रमिला मनोज चौधरी यांनी नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा, नाली सफाई, स्ट्रीट लाईट, स्वच्छता आदी मूलभूत सुविधांबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी येत असल्याने त्या समस्यांचे तातडीने निराकरण व्हावे, यासाठी त्यांनी नगराध्यक्ष सौ. विद्याताई आत्राम यांना सविस्तर निवेदन सादर केले आहे.
निवेदनात प्रभागातील खाती चौक परिसरातील बंद अवस्थेत असलेला शौचालय बंद करून त्या ठिकाणी बगीचा तयार करणे, इंदिरा चौक येथील बंद असलेला शौचालय बंद करून वॉटर एटीएम मशीन सुरू करणे, अंडरग्राऊंड नाल्या साफ करणे, काळे हॉस्पिटल ते ठाकरे हॉस्पिटल रस्त्यावर गतिरोधक लावणे, कॉंक्रिट रोड बनविणे, विविध ठिकाणी नाली वर चेंबर बसविणे इत्यादी मागणी करण्यात आली आहे. “नागरिकांचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून प्रत्येक समस्या मार्गी लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल,” असे मत यावेळी नगरसेविका सौ. प्रमिला चौधरी यांनी व्यक्त केले.