वणी /
राज्यातील राजकीय समीकरणे वेगाने बदलत असताना Maharashtra राज्यात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. Yavatmal district जिल्ह्यात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला असून, राज्याचे उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत वणी विधानसभा क्षेत्रासह जिल्ह्यातील काँग्रेस, शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मधील डझनाहून अधिक पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथील ‘नंदनवन’ निवासस्थानी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री Sanjay Rathod यांच्या विशेष पुढाकाराने हा भव्य पक्षप्रवेश सोहळा शुक्रवारी दुपारी पार पडला. यावेळी वणी आणि परिसरातील अनेक मातब्बर नेत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश केला.
पक्षप्रवेश करणाऱ्यांमध्ये आशिष खुळसंगे (माजी जिल्हा परिषद सदस्य व वसंत जिनिंगचे अध्यक्ष – काँग्रेस), दीपक कोकास (उपजिल्हाप्रमुख – शिवसेना उबाठा), गजानन किन्हेकर (ज्येष्ठ काँग्रेस नेते व माजी तालुकाप्रमुख), राजू तुरणकर (माजी नगरसेवक तथा माजी शहरप्रमुख), अजिंक्य शेंडे (युवासेना उपजिल्हाप्रमुख), सोमेश्वर गेडेकर - ग्रां.पं.सदस्य, पंकज मुंडे (माजी नगरसेवक), तसेच राजू वनकर व नितीन निघोट (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गट शहर पदाधिकारी) यांचा समावेश आहे.
याशिवाय डॉ. मारुती माशेलकर, शंकर पाचभाई, विलास निखाडे यांसारख्या स्थानिक पातळीवरील प्रभावी नेत्यांच्या प्रवेशामुळे ग्रामीण भागातही शिंदे गटाची पकड अधिक मजबूत झाल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
हा केवळ पक्षप्रवेश नसून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वणी विधानसभा मतदारसंघात झालेली मोठी राजकीय उलथापालथ मानली जात आहे. विशेषतः वणी, मारेगाव आणि झरी या तालुक्यांतील काँग्रेस व उबाठा गटाची फळी कमकुवत झाल्याने विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
“विकासाचे राजकारण आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे,” अशी भावना नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
*‘संघटन आणि विकास’ हीच ताकद – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे*
नवागतांचे स्वागत करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “राज्यातील महायुती सरकार सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील या पक्षप्रवेशामुळे आमची ताकद वाढली असून, विकासकामे घराघरात पोहोचवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे.”