वणी : प्रतिनिधी
राज्यात जबरदस्तीचे धर्मांतर, फसवणूक करून विवाह, तसेच महिलांच्या सुरक्षिततेशी संबंधित घटनांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात कठोर कायदा करावा, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने उपविभागीय अधिकारी वणी यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिनांक २० फेब्रुवारी ला निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात पालघर येथील श्रद्धा वालकर प्रकरण, तसेच इतर राज्यांतील काही हत्यांच्या घटनांचा उल्लेख करण्यात आला आहे. समितीच्या मते अशा घटना समाजासाठी चिंताजनक असून महिलांच्या सुरक्षिततेसाठी विशेष कायद्याची गरज आहे.
बेपत्ता महिलांची आकडेवारी
समितीने National Crime Records Bureau (NCRB) च्या अहवालाचा संदर्भ देत २०१९ ते २०२१ दरम्यान महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने महिला व मुली बेपत्ता झाल्याचा दावा केला आहे. तसेच राज्य विधिमंडळात सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार २०२४-२५ या कालावधीतही हजारो महिला बेपत्ता झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणांचा सखोल तपास करून जबरदस्ती, फसवणूक किंवा मानवी तस्करीचे कोन तपासावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा
निवेदनात बंदी घातलेल्या Popular Front of India (PFI) चा उल्लेख करत काही प्रकरणांमध्ये संघटित कट असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र अशा दाव्यांबाबत अधिकृत तपास आणि न्यायालयीन निष्कर्ष महत्त्वाचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
इतर राज्यांतील कायदे
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, गुजरात आणि हिमाचल प्रदेश या राज्यांनी जबरदस्तीच्या धर्मांतराविरोधात कायदे केले आहेत. महाराष्ट्रानेही त्याच धर्तीवर कायदा करावा, अशी मागणी समितीने केली आहे.
प्रमुख मागण्या
जबरदस्ती किंवा फसवणूक करून केलेल्या धर्मांतराविरोधात कठोर व अजामीनपात्र कायदा करावा,
प्रत्येक जिल्ह्यात विशेष तपास पथक स्थापन करावे,
अशा प्रकरणांसाठी जलदगती न्यायालये स्थापन करावीत. बेपत्ता महिलांसाठी विशेष शोधमोहीम राबवावी, पीडित महिलांसाठी २४x७ हेल्पलाइन व समुपदेशन सेवा सुरू करावी. अशा मागण्या समितीने केल्या आहेत.
निवेदन देतेवेळी श्री सुनील घनवट, लोभेश्वर टोंगे, अनुराग काठेड,सौ माया वराटे, विद्याताई चंदे, वंदना ताजणे, निर्मला मत्ते, रजनीताई राजुरकर, कविता आस्वले, मंदा पारखी, मंगला गोजे, पार्वती शंभरकर, गीता गौरकार, श्री बनवारी पांडे, मनिषा शंभरकर, वंदना पुरेकर, मंगला टोंगे, आशा पारखी, दिपाली देहारकर,पुष्पा चिडे, सरिता कोंडावार, अर्जुन वैद्य, कौशिक सोनोने, यश चौहान, सुशांत पेशेट्टीवार, शंकर झाडे, आर्यन हर्षवाल, विर तोटेवार, ओम आष्टीकर, विठ्ठल देठे इत्यादी सह हिंदू जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.