स्टिंग ऑपरेशन न्यूज/
मागील दोन वर्षांपासून गौराळा ग्रामपंचायतीच्या वतीने हळदी-कुंकू कार्यक्रम सातत्याने आयोजित करण्यात येत असून, याही वर्षी हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमातून महिलांचा सन्मान, सहभाग आणि सामाजिक एकोपा जपण्याचा प्रयत्न करण्यात आला.
यंदाच्या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे महिलांनी आरोग्य विषयक काळजी घ्यावी, स्वच्छता राखावी व दैनंदिन जीवनात आरोग्यविषयक सवयी अंगीकाराव्यात, याबाबत जनजागृती करण्यात आली. याच अनुषंगाने उपस्थित महिलांना हॅन्डवॉशचे वाटप करून वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
कार्यक्रमात महिलांना अन्याय-अत्याचाराला बळी न पडता आत्मविश्वासाने स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा, तसेच आरोग्यदृष्ट्या सजग राहण्याचा संदेश देण्यात आला. सरपंच मयुरीताई चंद्रकांत धोबे, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका दोडके मॅडम, सरपंच साल्लेभटी सौ. निर्मला बोंद्रे, अंगणवाडी सेविका रोगे मॅडम व मिलमिले मॅडम, ग्रामपंचायत सदस्य सौ. अनिता कोयचाडे, सुरेखा कोडापे, शरदा येरकाडे, आशा सेविका जुली राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमास गावातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ग्रामपंचायतीच्या उपक्रमाचे कौतुक केले.