मातृभक्ती ही इथल्या मातीचा स्थायीभाव - गजानन कासावार

वणी:–

      मातेची महती ही आपल्या भारतीय संस्कृतीचे महनीय सूत्र आहे. जननी, जन्मभूमी आणि जगन्माता याची पूजा ही भारतीय संस्कृतीची त्रिसूत्री आहे. मातृभक्ती ही इथल्या मातीचा स्थायीभाव आहे. म्हणूनच कवी बंकिमचंद्र चटोपाध्याय यांचा हुंकार कोट्यवधी लोकांनी वंदे मातरम् हा मंत्र स्वरूपात स्वीकारला आणि भारताची ती स्फूर्तीदायी घोषणा बनली. परकीयांविरुद्ध लढण्याचे एक धारदार शस्त्र बनले. असे प्रतिपादन अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य तथा नगर परिषदेचे प्र. प्रशासन अधिकारी गजानन कासावार यांनी केले. 
       बंकिमचंद्र चटोपाध्याय यांनी रचलेल्या 'वंदे मातरम्' या भारत मातेच्या स्तुतीच्या प्रेरणा स्तोत्राला 150 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त येथील शासकीय मैदानावर भारतमातेच्या स्तुतीचा गौरव दिन दिनांक 7 नोव्हेंबरला सकाळी 9 वाजता आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात ते मुख्य वक्ते म्हणून बोलत होते. या सार्धशताब्दी महोत्सवा निमित्त आयोजित करण्यात आलेले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी किशोर गज्जलवार, प्रमुख अतिथी म्हणून तालुका आरोग्य अधिकारी डॉ. समिर थेरे , पोलिस निरीक्षक गोपाल उंबरकर, तालुका क्रीडा अधिकारी शिल्पा चाबुकस्वार, प्राचार्य प्रसाद खानझोडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शासकीय आयटीआय चे प्राचार्य तथा वंदे मातरम् तालुका स्तरीय आयोजन समितीचे सचिव संजय तेलतुंमडे यांनी प्रास्ताविक केले. 
        आपला विषय मांडताना कासावार म्हणाले की, वंदे मातरम् या गीताला 7 नोव्हेंबर रोजी 150 वर्ष पूर्ण झाले. 1857 च्या स्वातंत्र्य समरा नंतर निर्माण झालेल्या विपरीत स्थितीत बंकिमचंद्राना हे स्तवन सुचले. स्वातंत्र्य लढ्याला वंदे मातरम् या दोन शब्दांचे अस्त्र मिळाले. त्यामुळे या दोन शब्दांनी स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास बदलला. वंदे मातरम् म्हणजे माते तुला वंदन असा साधा सरळ अर्थ होतो. पण वंदे मातरम् या दोन शब्दांचे एवढे भय इंग्रजांना का वाटत होते हे एक मोठे कोडे आहे. रविंद्रनाथ टागोर व श्री अरविंदाना यात मंत्र सामर्थ्य दिसले. 1896 मध्ये या राष्ट्रीय गीताचे पहिल्यांदा गायन रविंद्रनाथ टागोर यांनी केले. त्यानंतर 1905 मध्ये वंगभंग विरोधी आंदोलनात 20 ऑगस्ट 1905 ला अचानक वंदे मातरम् ची घोषणा झाली. त्यानंतर लगेच या दोन शब्दांच्या सामूहिक गर्जनेने आसमंत दुमदुमला. या प्रसंगापासून वंदे मातरम् हे स्वातंत्र्य लढ्याचे युद्ध घोष झाले. 
       अध्यक्षीय भाषण करताना किशोर गज्जलवार यांनी स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासाचा मागोवा घेऊन या देशाच्या प्रत्येक मानचिन्हाचा आपण आदर केला पाहिजे असे प्रतिपादन केले. 
      कार्यक्रमाच्या सुरुवातीला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य संग्रामातील प्रसंग उभे करून नाटिका सादर केली. त्यानंतर बरोबर 9*50 उपस्थित हजारो विद्यार्थ्यांनी सामूहिक वंदे मातरम् चे गायन केले. यासाठी लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ते संगीतबद्ध केले. 
     या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या शिल्पनिदेशिका साधना माटे यांनी केले. आभार प्रदर्शन शिल्प निदेशक शशिकांत लेनगुळे यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post