पाटोदा, हिवरे बाजार अभ्यास दौऱ्यातून स्वावलंबनाचा निर्धार ; सरपंच तुकाराम माथनकर यांनी ग्रामस्थांना घडवून आणली आदर्श ग्राम पाटोदा व आशिया खंडातील श्रीमंत गाव "हिवरे बाजार" भेट

वणी /

वणी तालुक्यातील उमरी गावातील ग्रामस्थांनी आदर्श ग्राम पाटोदा गावचा अभ्यासदौरा केला. यावेळी आशिया खंडातील विकासाच्या दृष्टीने सर्वात श्रीमंत गाव हिवरे बाजार ला भेट दिली.
 आपल्या गावाचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी आणि गावाला आदर्श बनवण्यासाठी या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. 'आपलं गाव स्वावलंबी, आत्मनिर्भर, सुसज्ज आणि स्वशासी व्हावं' या उद्देशाने ही भेट घडवण्यात आली.
या भेटीदरम्यान पाटोदा व हिवरे बाजार गावात राबवलेल्या विविध योजना, यशस्वी कार्यपद्धती, स्वच्छता मोहिमा, रस्त्यांची अवस्था, शैक्षणिक सुविधा, जलसंधारण, लोकसहभागातून झालेला विकास इत्यादी बाबींचा बारकाईने अभ्यास करण्यात आला. पाटोदा व हिवरे बाजार गावाने अंमलात आणलेल्या योजनांमुळे गावात कसा परिवर्तन झाला, हे प्रत्यक्ष पाहिल्यानंतर उमरी गावातील ग्रामस्थांमध्ये एक नवचैतन्य निर्माण झाले. ही भेट सरपंच तुकाराम माथनकर यांच्या पुढाकाराने झाली. 
गावासाठी काहीतरी चांगले घडवायचे, हे मनाशी ठरवूनच सरपंच तुकाराम माथनकर यांच्या पुढाकारातून ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, गावातील महिला ग्रामस्थांनी ही भेट १७ ऑक्टोंबर २०२५ रोजी घेतली.
 पाटोदा व हिवरे बाजार गावात गेल्यानंतर तेथील नागरिकांचे सहकार्य, नेतृत्व, शासन योजनांचा प्रभावी उपयोग आणि ग्रामविकासाच्या दृष्टीने एकत्रितपणे केलेले प्रयत्न पाहून उमरी गावातील ग्रामस्थ भारावून गेले.
आपण गावासाठी काही ना काही योगदान दिलंच पाहिजे, ही भावना सर्व ग्रामस्थांच्या मनात प्रबळ झाली. आपल्या नावाची खरी ओळख ही गावातूनच होते, ही जाणीव मान्य केली. त्यामुळे परतल्यानंतर आपल्या गावातही विकासाच्या योजना राबवायच्या, गावाला आदर्श बनवण्याचा संकल्प केला.
गावासाठी नवीन दिशा, 

या अभ्यासदौऱ्यामुळे उमरी गावासाठी नवीन दिशा, प्रेरणा आणि विकासाचा रोडमॅप निश्चित झाला आहे. भविष्यात उमरी गाव देखील एक आदर्श गाव म्हणून नावारूपास यावा, या दृष्टिकोनातून गावात कामे केली जाणार असल्याचे सरपंच तुकाराम माथनकर यांनी सांगितले. विशेष म्हणजे सरपंच तुकाराम माथनकर यांना नुकताच नालंदा ऑर्गनायजेशन संस्थेकडून आदर्श सरपंच पुरस्कार मिळाला आहे त्यामुळे हा अभ्यास दौरा गावाच्या विकासासाठी भर पडणार आहे आणि तशी तळमळ सरपंच तुकाराम माथनकर यांच्या कार्यातून दिसून येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post