त्या खुनाचे रहस्य उलगडले, तो खुन अनैतिक संबंधातून , पोलीसांनी दोन आरोपींना केली अटक

वणी /

वणी शहरात घडलेल्या एका खळबळजनक हत्याकांडाचा वणी पोलीसांनी अवघ्या काही तासांत छडा लावला असून अनैतिक संबंधातून तो खुन झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या हत्या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सुमेश रमेश टेकाम (२४) आणि सौरभ मारुती आत्राम (२७) दोघेही रा. वडजापूर ता. वणी येथील आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी असलेल्या सुमेश रमेश टेकाम याचे मृतक स्वप्नीलच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. स्वप्नील राऊत त्याच्या पत्नीला मारहाण करायचा. यामुळे सुमेश स्वप्नीलवर राग धरुन होता. गुरुवारी दुपारी ४.३० वाजता सुमेश आणि सौरभ दुचाकीवरून जत्रा मैदानावर पोहोचले. तेथून त्यांनी स्वप्नीलला फोन केला. दारू पिण्याच्या बहाण्याने तिघेही दुचाकीवर बसले आणि वरोरा रोड रेल्वे क्रॉसिंग, संविधान चौक मार्गे गजानन नगरी येथे पोहोचले. वाटेत सुमेशने एका वाईन शॉपमधून दारू खरेदी केली.
दारू पार्टी दरम्यान, आरोपींनी स्वप्नीलला जाणूनबुजून जास्त दारू पाजली. त्यानंतर आरोपी सुमेशने एक मोठा दगड घेतला आणि स्वप्नीलच्या डोक्यावर मारला. दगडाने मारल्यानंतर स्वप्नील वाचू नये म्हणून आरोपींनी दारूची बाटली फोडली आणि स्वप्नीलचा गळा चिरला. स्वप्नीलची हत्या केल्यानंतर दोन्ही आरोपी त्यांच्या दुचाकीवरून पळून गेले. ही हत्या पोलिसांसाठी आव्हान बनली होती. परंतु फॉरेन्सिक रिपोर्ट आणि तांत्रिक तपास तयार केल्यानंतर पोलिसांनी २४ तासांच्या आत दोन्ही आरोपींना तुरुंगात टाकले.

या हत्येचा उलगडा करण्यात पोलिस निरीक्षक गोपाळ उंबरकर, उपनिरीक्षक सुदाम असोरे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. अटक केलेल्या आरोपींना रविवारी, २६ ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post