स्टिंग ऑपरेशन न्यूज/
संस्कृत भाषेच्या आणि भारतीय संस्कृतीच्या प्रचार आणि प्रसारासाठी तयार करण्यात आलेल्या गीर्वाण वाणी या लोकमान्य टिळक महाविद्यालय वणीच्या संस्कृत विभाग प्रमुख विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड यांच्या प्रयत्नाने साकारलेल्या यूट्यूब चैनल च्या आधारे, राष्ट्रीय शैक्षणिक संसाधन स्वयम् च्या धर्तीवर तयार करण्यात आलेले नीतीशतकम् आणि भारतीय स्वयं शिक्षा पद्धती हे अभ्यासक्रम आता सेंट विन्सेंट पलोटी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहेत.
महाविद्यालयाचे संचालक फादर डॉ.पाॅल चंद्रकुनेल यांच्या मार्गदर्शनात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजय वाढई यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांच्यावतीने प्रा. डॉ. स्वानंद पुंड यांनी स्वाक्षरी केली. संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. मनोज ब्रह्मे यांनी विशेष स्वारस्य दाखवत हा सामंजस्य करार करण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका वठवली. याप्रसंगी शैक्षणिक कार्य समन्वयक डॉ. कोमल गेहानी यादेखील विशेषत्वाने उपस्थित होत्या.
करारावर स्वाक्षरी करताना प्राचार्य डॉ विजय वाढई व प्रा डॉ. स्वानंद पुंड
लोकमान्य टिळक महाविद्यालयाने तयार केलेले अभ्यासक्रम उपलब्ध करून देणे, तज्ञ प्राध्यापकांच्या परस्पर सहयोगाच्या माध्यमातून दोन्ही महाविद्यालयात चर्चासत्र तथा वर्ग घेणे, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहकार्य करणे अशा विविध पैलूंच्या दृष्टीने हा सामंजस्य करार संपन्न करण्यात आला आहे.
आगामी सत्रापासून विद्यार्थ्यांना हे संपूर्ण ऑनलाईन आणि पूर्णतः नि:शुल्क अभ्यासक्रम उपलब्ध होणार असून भविष्यात भारतीय ज्ञानपरंपरा या विषयात विविध अभ्यासक्रमांची निर्मिती आणि कार्यान्वयन करण्यावर करारामध्ये भर देण्यात आलेला आहे.
यापूर्वी विविध विद्यापीठांसोबत आणि महाविद्यालयांसोबत झालेल्या सामंजस्य करारातून अनेक विद्यार्थ्यांनी लाभ घेतलेले आणि जगभरातून हजारो संस्कृत प्रेमींनी प्रतिसाद दिलेले हे अभ्यासक्रम आता इंजीनियरिंग महाविद्यालयात सुरू होणे ही सर्वच संस्कृत प्रेमींच्या दृष्टीने निश्चितच अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे.