वणी /
वणीच्या राजकीय वर्तुळात आज मोठा भूकंप घडला आहे. भाजपचे वरिष्ठ नेते राज्य कार्यकारिणी सदस्य आणि वणीतील लोकप्रिय ज्येष्ठ समाजसेवक विजय बाबू चोरडिया यांनी आज मुंबई येथे शिवसेना शिंदे गटात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अधिकृत प्रवेश केला आहे.
नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या मोठ्या घडामोडीमुळे भाजपला वणीत मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून वणी विधानसभा क्षेत्रात राजकीय समीकरण बदलणार असल्याचे बोलले जात आहे.
विजय चोरडिया यांचा पक्षप्रवेश कार्यक्रम राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यवतमाळ चे पालकमंत्री संजय राठोड, मंत्री गुलाबराव गावंडे, मंत्री संजय शिरसाठ यांच्या उपस्थितीत पार पडला. विजय चोरडिया यांच्या समवेत आशिष काळे, राहुल मुंजेकर यांनीही शिवसेनेत प्रवेश केला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
पक्षप्रवेश प्रसंगी वणी तील शिवराज पेचे, अनिल ढगे आणि चंद्रकांत घुगुल यांचीही उपस्थिती होती.
विजय चोरडिया हे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असून त्यांनी अनेक लोकोपयोगी उपक्रम, आरोग्य शिबिरे आणि सामाजिक कार्यांच्या माध्यमातून शहरात तसेच ग्रामीण भागात आपली मजबूत पकड निर्माण केली आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेना शिंदे गटाला स्थानिक पातळीवर मोठा फायदा होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मागील काही दिवसांपासून भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी उफाळून आली होती त्यामुळे विजय चोरडिया भाजप नेतृत्वावर नाराज असल्याची चर्चा होती, दरम्यान शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याची चर्चाही रंगत होती अखेर त्यांनी भाजपची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केला.
पक्षप्रवेशानंतर विजय चोरडिया यांनी स्टिंग ऑपरेशन न्यूज ला आपल्या प्रतिक्रिया देताना म्हटले की,
> “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वणीच्या विकासासाठी अधिक कार्यक्षमतेने काम करता येईल. जनतेच्या अडचणी दूर करून त्यांच्या कामांना वेग देणे हे माझे उद्दिष्ट आहे. शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली वणीच्या विकासाची गती धडाक्यात वाढवणार आहे.”- विजय चोरडिया
विशेष म्हणजे, विजय चोरडिया यांचे पुत्र कुणाल चोरडिया यांची नुकतीच भाजप यवतमाळ जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता “पिता शिवसेना शिंदे गटात आणि पुत्र भाजपमध्ये” अशी आगळीवेगळी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे.
नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीमुळे वणीतील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची चिन्हे आहेत. आगामी काही दिवसांत या निर्णयाचा नेमका परिणाम काय होतो आणि भाजप या धक्क्यातून स्वतःला कसा सावरतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.