वणी /
वणी शहराची ग्रामदैवत श्री जैताई माता मंदिर प्रांगणामध्ये जैताई संस्थानाच्या अनुमतीने श्री विश्वयोग आयुर्वेदिक चिकित्सालय व रिसर्च सेंटरच्या मार्फत उपाशीपोटी नाडी परीक्षण व मोफत आयुर्वेद उपचार नवरात्र मध्ये करण्यात आले. सेंटरच्या प्रमुख आयुर्वेदाचार्य सुवर्णा चरपे यांच्या तर्फे घटस्थापना ते नवमी पर्यंत जैताई प्रांगणात येणाऱ्या भाविकांचे शास्त्रोक्त नाडी परीक्षा, आयुर्वेदोक्त रोगनिदान, आहारविहार मार्गदर्शन, अग्निकर्म, विद्धकर्म, लेपन चिकित्सा, नस्योपचार तसेच आठवडाभराची आयुर्वेदिक औषधे मोफत वितरण करण्यात आली. या उपक्रमाचे हे सलग दुसरे वर्ष आहे. एकुण दोनशे पंच्याऐंशी रुग्णांनी या आरोग्य सेवेचा लाभ घेतला. सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत चालणाऱ्या या आरोग्य सेवा महायज्ञामधे प्रत्येक वयोगटातील माताभगिनींना "सशक्त नारी, सशक्त परिवार, सशक्त देश" या संकल्पनेवर समुपदेशन करण्यात आले. समाजामध्ये आजारी पडल्यावर उपचार करण्यापेक्षा, आजारीच पडु नये यासाठी काय करावे? हे आरोग्यभान रुजणे गरजेचे आहे, नैसर्गिक जिवनशैली सशक्त शरीर व प्रगल्भ संज्ञा निर्माण करते, संज्ञात्मक बुद्धी कलात्मक व कुशल विश्व घडवते.
त्यासाठी असे सामाजिक उपक्रम सातत्याने राबवणे आवश्यक आहेत, असे मत वैद्य सुवर्णा चरपे यांनी व्यक्त केले.
या काळात उद्भवणाऱ्या सर्दी, खोकला,शिंका येणे, दम्याच्या आजारांवर सेंटरकडुन कोजागिरी पौर्णिमेला विशेष औषध देण्यात येणार आहे. त्यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन सेंटरतर्फे करण्यात आले आहे.
तिस रुपये माफक नोंदणी शुल्कातून गोळा झालेली रक्कम देवस्थान कमिटीला दान करण्यात आली.
या उपक्रमाला जैताई संस्थानाचे अध्यक्ष माधवराव सरपटवारांच्या विशेष शुभेच्छा, तसेच मुन्ना लाल तुगनायत यांचे प्रशंसनीय सहकार्य लाभले. उपक्रमाची धुरा सेंटरचे सहकर्मी सौ. सुनंदा शिलमनवार, निखिल वाघाडे, गौरव शिलमनवार व स्वयंसेवक श्रीमती आशाताई सोनारे यांनी समर्थपणे सांभाळली.