वणी /
डेंग्यू हा डासामुळे पसरणारा विषाणुजन्य आजार आहे. एडिस इजिप्टाय प्रकारच्या डासांच्या विषाणू संसर्गित मादीच्या चावण्यामुळे या रोगाची लागण होते. डास चावल्यानंतर साधारणतः पाच ते सात दिवसानंतर डेंग्यू आजाराची लक्षणे दिसायला लागतात. डेंग्यू ताप हा फ्ल्यू सारखाच ताप आहे. एडिस या डासाच्या अंगावर पांढरे पट्टे असतात. त्यामुळे त्याला टायगर मॉस्क्यूटो असेही म्हणतात. हा डास दिवसा चावतो. पूर्ण डास होण्याकरिता किमान 7 ते 10 दिवसाचा कालावधी लागतो. डासाची उत्पत्ती घरातील पाणी वापरण्यातील भांडी, ड्रम, रांजण,सिमेंट टाकी,कुंड्या, खराब झालेले टायर्स व प्लास्टिकच्या टाकाऊ वस्तू इत्यादीच्या साचलेल्या पाण्यात होते.
जिल्ह्यातील सर्व शहरी विभागात डेंग्यू रुग्णावर नियंत्रण मिळविण्याकरिता मा. जिल्हाधिकारी यांनी नगर परिषद व नगर पंचायतच्या मुख्याधिकारी यांना वस्तीसेविका (Breeding Cheker ) यांना नियुक्त करणेबाबत सूचना देण्यात आलेल्या होत्या त्या अनुषंगाने माहे जुलै या महिन्यापासून वस्ती सेविका, आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मार्फत नियमितपणे प्रत्यक्ष गृहभेटीद्वारे सर्वेक्षण करण्यात येत आहे.
मा. विकास मिना, जिल्हाधिकारी, यवतमाळ, डॉ. मंदार पत्की , मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. यवतमाळ, व डॉ. सुभाष ढोले, जिल्हा आरोग्य अधिकारी यवतमाळ, यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार तसेच डॉ. तन्वीर शेख जिल्हा हिवताप अधिकारी, यवतमाळ, डॉ. सचिन गाडे मुख्याधिकारी नगर परिषद वणी व डॉ. समीर थेरे तालुका आरोग्य अधिकारी यांचे नेतृत्वात वणी नगर परिषद क्षेत्रांतर्गत सर्व वार्डात हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
नगर परिषद मार्फत वस्ती सेविकेची(Breeding checker) निवड करण्यात आली असून त्यांचे मार्फत दररोज 45 ते 50 घरांना भेटी देण्यात येत आहेत त्यानुसार 10 दिवसात सर्व घरांना प्रत्यक्षात भेटी होत आहे. या भेटी दरम्यान वस्तीसेविका घरातील बाहेरचे वापरण्यातील भांडी, ड्रम, कुलर, कुंड्या, खराब टायर्स, घर परिसरातील प्लास्टिकच्या टाकाऊ वस्तु इत्यादीचे टॉर्च द्वारे सर्वेक्षण करण्यात येते. ज्या भांड्यात डास अळी आढळून आलेली आहे ती रिकामी करणे व जी भांडी रिकामी करण्या योग्य नाही अशा भांड्यात टेमिफॉस द्रावण टाकून डासांच्या अळ्या नष्ट केल्या जातात. पुन्हा डासाची उत्पत्ती होऊ नये याकरिता घरातील व्यक्तींना डासांबद्दल व डासापासून होणाऱ्या आजारांबाबत आरोग्य शिक्षण देऊन जनजागृती केल्या जात आहे. हे सर्वेक्षण महिन्यातून दोनदा याप्रमाणे सुरू आहे. हा उपक्रम माहे जुलै महिन्यापासून ते माहे ऑक्टोंबर 2025 पर्यंत राबविण्याबाबत आदेशित केलेले आहे.
सदर नाविन्यपूर्ण उपक्रम वस्तीसेविका, आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचारी यांचे मार्फत घरोघरी जाऊन किटकजन्य आजार बाबत जनजागृती, टेमिफॉस ॲक्टिविटी, तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे इत्यादी कार्यवाही युद्ध स्तरावर नियमितपणे सुरू आहे त्यामुळे पुढील कालावधीत वणी शहरात डेंग्यू दूषित रुग्ण संख्येत नियंत्रण मिळविणे शक्य होईल असे मत मुख्याधिकारी डॉ. सचिन गाडे यांनी व्यक्त केले आहे.