जैताई देवस्थानात शारदीय नवरात्राचे आयोजन

वणी /

           वणी नगरीची ग्रामदेवता असणाऱ्या देवी जैताई मंदिरामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी या काळात शारदीय नवरात्राचे आयोजन करण्यात येत आहे. 
         २२ तारखेला घटस्थापना आणि धार्मिक विधी संपन्न झाल्यानंतर २३ तारखेला महिला भजनी मंडळाच्या भजन सेवेने कार्यक्रमाची सुरुवात होईल.
         २४ तारखेला गिरीश गांधी यांच्या अध्यक्षतेखाली, तरुण भारताचे संपादक शैलेश पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत माधव सरपटवार यांना जैताई मातृगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल.
         २५ तारखेला नूपुर निकेतन या संस्थेद्वारे वणी आणि नागपूरच्या कलाकारांच्या माध्यमातून शास्त्रीय नृत्याचा कार्यक्रम सादर होईल.
        २६ तारखेला ह.भ.प.श्रेयस बडवे यांचे तर २७ तारखेला ह.भ.प. सौ.मानसी बडवे यांचे स्वतंत्र कीर्तन आयोजित करण्यात आले असून २८ तारखेला त्यांची कीर्तन जुगलबंदी सादर होईल. २९ ला ह.भ.प.श्रेयस बडवे यांच्या कीर्तनाने या चार दिवसीय कीर्तन सेवेची सांगता होईल. 
         ३० तारखेला विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड यांचे श्री जगदंबा महात्म्य या विषयावर प्रवचन आयोजित करण्यात आले असून १ ऑक्टोबर रोजी जैताई भजन मंडळाच्या भजन सेवेने कार्यक्रमाची सांगता होईल. 
        नित्य पूजन, सप्तशती पाठ, अष्टमी-नवमीचा महायाग असे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार असून महिला मंडळासाठी ओटी भरण्याची विशेष सुविधा निर्माण करण्यात आलेली आहे.सोबतच मंदिरात डॉ.मनोहरपंत बरडे उमरेड जि.नागपूर यांच्या उदार देणगीतून नव्याने बांधण्यात आलेल्या नूतन वास्तूचे
उद्घाटन देखील होणार आहे 
नवरात्रात रोज सकाळी ११ वाजता भक्तांसाठी महाप्रसादाचे 
आयोजन केले जाते. देणगीची पावती फाडून देवीभक्त या अन्नदानात सहभागी होऊ शकतात. रोजची 
सामुहिक आरती सायंकाळी ठीक ६..३० वाजता संपन्न होईल.
         देवस्थानच्या प्रांगणात रोज सायंकाळी साडेसात वाजता संपन्न होणाऱ्या या वरील सर्व कार्यक्रमांचा वणीकर जनतेने तथा समस्त देवी भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन जैताई देवस्थान समितीच्या वतीने सचिव ह. भ. प. मनु महाराज तुगनायत यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post