वणी /
शहरातील मध्यभागी असलेल्या गुरुनगर वार्ड क्रमांक ४ मध्ये गेल्या दोन महीन्यापासुन अनियमित पाणीपुरवठा सुरु आहे त्यामुळे पाणी भरण्यास खूप तास जात आहे.
पाण्याचा प्रश्न म्हणजे महिलांना चिंता! पाण्यासाठी महिलांना काम धंदा सोडून रात्री बेरात्री जागे राहावे लागते त्यामुळे खुप त्रास सहन करावा लागत आहे असे त्या सांगतात. त्यामुळे नगर पालिकेने गुरुनगर वार्ड क्रमांक ४ मधिल पाण्याची समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
याबाबतचे निवेदन युवा सेना नेते अजिंक्य शेंडे यांच्या नेतृत्वात महिलांनी शुक्रवारी दिनांक १ ऑगस्ट ला उपमुख्याधिकारी श्री जयंत सोनटक्के नगर परिषद वणी यांना दिले आहे.
सात दिवसांत पाण्याची समस्या न सुटल्यास महिलांचा नगर पालिकेवर घागर मोर्चा !
वणी शहरातील अनेक भागात अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. पिण्याचे पाणी तर मिळत नाही मात्र पाणी कराचे बिल वेळेवर दिले जाते विशेष म्हणजे वेळेवर बिल न भरल्यास त्या बिलावर व्याज आकारणी केली जाते, हा वणी कर नागरिकांवर अन्याय नाही का? जे तुम्ही वेळेवर बिल देता तसे वेळेवर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करा ना.? शहरातील गुरुनगर वार्ड क्रमांक ४ मध्ये तर रात्रंदिवस पाण्यासाठी महिलांना भटकावे लागत आहे या भागातील पाणी समस्या सात दिवसांत न सोडविल्यास महिलांना घेऊन नगर पालिकेवर घागर मोर्चा काढण्यात येईल - अजिंक्य शेंडे, युवा सेना उपजिल्हाप्रमुख