वणी /
सामाजिक कार्यकर्ते आणि भारतीय जनता पार्टीचे भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य विजयबाबू चोरडिया यांनी सामाजिक कार्यांचा वसा घेतला. तीच परंपरा यांचे चिरंजीव एडवोकेट कुणाल चोरडिया चालवत आहेत. आतापर्यंत या पिता-पुत्रांनी केलेले आणि सुरू असलेले सगळेच कार्य हे अद्भुत आहेत. जनता त्यांच्या पाठीशी आहे. सोबतच भारतीय जनता पार्टीदेखील सदैव त्यांची साथ देईल. असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष एडवोकेट प्रफुल्ल चव्हाण यांनी केले. स्थानिक श्री विनायक मंगल कार्यालयात एडवोकेट कुणाल चोरडिया यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित केला होता. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी मंचावर विजयबाबू चोरडिया, माजी नगराध्यक्ष तथा माजी जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, अमोल ढोणे, भाजपचे जिल्हा महामंत्री राजू पडगिलवार, माजी जिल्हा परिषद सदस्य बंडू चांदेकर, ऍड. कुणाल चोरडिया, पवन एकरे, माजी नगरसेविका संध्या अवताडे, प्रीती बिडकर, स्वाती खरवडे, महाकुलकर, मुंजेकर आदी मान्यवर उपस्थित होते. या उन्हाळी सत्रात दहावी आणि बारावीतील अनेक विद्यार्थी गुणवत्ता यादीत आलेत. त्यांची प्रेरणा सर्वांना मिळावी म्हणून एडवोकेट कुणाल चोरडिया यांनी गुणवंतांचा सत्कार शनिवारी ५ जुलैला आयोजित केला होता. आपल्या प्रास्ताविक भूमिकेतून एडवोकेट कुणाल चोरडिया यांनी विद्यार्थी कल्याणाचे विविध पैलू मांडले. कोणत्याही गरजू विद्यार्थ्यांच्या आणि जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी तत्पर राहण्याचा शब्दही त्यांनी दिला.
यवतमाळ जिल्हा भाजपचे माजी अध्यक्ष तथा वणीचे नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी ज्ञानार्जनावर भर दिला. विद्यार्थ्यांनी डोळ्यांसमोर नेहमी मोठंच ध्येय ठेवण्यासाठी त्यांनी सांगितलं. आपण घेतलेल्या ज्ञानाचा आपल्या आयुष्यातील प्रत्येक महत्त्वाच्या क्षणी उपयोग करावा. शिक्षित आणि सुशिक्षित या दोन शब्दांमध्ये खूप मोठा फरक आहे. सुशिक्षित हा बेरोजगार नसतो. तो स्वबळावर मोठं साम्राज्य उभं करू शकतो. या दोन शब्दांमधील अंतर समजून घेतले तरी आपण उज्वल भविष्य घडवू शकतो. असे मत त्यांनी व्यक्त केले.
तर भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य विजय चोरडिया यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी आतापासूनच त्यांच्या पुढील जीवनाची दिशा ठरवावी. त्यासाठी योग्य नियोजन आणि परिश्रम करावेत. गुणवत्तेच्या बाबतीत कुठलीही तडजोड करू नये. अशा अनेक मार्गदर्शक सूचना त्यांनी केल्यात. नवनिर्वाचित भाजपा जिल्हाध्यक्ष ऍड. प्रफुल चव्हाण यांचेही अभिनंदन केले.
गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भाजपाचे जिल्हाध्यक्ष ऍड. प्रफुल चव्हाण यांनी विद्यार्थ्यांसमोर अनेक उदाहरणे ठेवलीत. वेगवेगळ्या विषयांचे त्यांनी दाखले दिलेत. विद्यार्थ्यांनी स्मार्ट फोन, कंम्प्युटर, इंटरनेटचा उपयोग सध्या तरी शिक्षणात उन्नत होण्यासाठीच करावा. सोशल मीडिया आणि अनावश्यक मनोरंजनांपासून दूर राहावं. मोबाईलचा योग्यच वापर करावा. विद्यार्थ्यांना ज्या क्षेत्रात रुची आहे तेच क्षेत्र शिक्षणासाठी निवडावे. यासाठी समोरचा दृष्टिकोन लक्षात घ्यावा. अपयश आले तरीही खचू नये. पुन्हा प्रयत्न करावेत. अशा अनेक विषयांवर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. दिलीप अलोणे यांनी केले. तर प्रा. सागर जाधव यांनी आभार मानलेत. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व पालक उपस्थित होते.