वणी /
महाराष्ट्रातील मराठी शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करण्याचा राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र विरोध दर्शवला होता. याविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ५ जुलै रोजी मुंबईत मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. मात्र, या मोर्चापूर्वीच राज्य सरकारने हिंदी भाषेच्या सक्तीसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द केले आहेत. यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्ष नेते राजू उंबरकर यांच्या उपस्थितीत रविवारी भर मुसळधार पावसात वणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ढोल ताशा व फटाक्याच्या अतिशाबाजीत आनंदोत्सव साजरा केला.
राज्य सरकारने पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्याबाबत काढलेले दोन्ही जीआर (शासकीय निर्णय) रद्द केल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याला 'मराठी शक्तीचा व एकजुटीचा विजय' म्हटले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात नुकतीच घोषणा केली असून, नव्याने स्थापन करण्यात आलेली समिती त्रिभाषा सूत्राचा, माशेलकर समितीचा अहवाल आणि विविध मतांचा विचार करून विद्यार्थ्यांच्या हितासाठी योग्य निर्णय घेईल असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्यासाठी मराठी आणि मराठी विद्यार्थी महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र मनसेने कोणत्याही समितीची बाजू ग्राह्य धरून हा निर्णय महाराष्ट्रात चालू देणार नाही असे परखड मत मांडत हिंदी सक्तीला तीव्र विरोध कायम ठेवला आहे.
रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्य सरकारच्या संयुक्त पत्रकार परिषदेत सद्यस्थितीतील दोन्ही शासन निर्णय मागे घेण्यात आले. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आक्रमक पावित्र्याला यश आले आहे. याच यशाचा मनसेकडून सर्वत्र आनंद साजरा केला जात आहे.
वणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पक्ष नेते राजू उंबरकर यांच्या उपस्थितीत शहरातील कार्यकर्त्यांनी एकत्रित येत चालू असलेल्या मुसळधार पावसात हा आनंद व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून फटाक्यांची भव्य अतिशाबाजी करण्यात आली. तर ढोल ताशाच्या गजरात राज ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा व मराठी एकजुटीचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या. यामुळे परिसरातील सर्व वातावरण मराठीमय झाल्याचे दिसून आले होते.
यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, शहराध्यक्ष अंकुश बोढे, मयुर गेडाम, अमोल मसेवार, मयुर घाटोळे, शंकर पिंपळकर, विलन बोदाडकर, अज्जू शेख, जितू शिरभाते, विठ्ठल हेपट, लक्की सोमकुंवर, हिरा गोहोकार, बंटी धानोरकर, राहुल देवनपल्लीवार, मयुर मेहता, कृष्णा कुकडेजा यांच्या सह असंख्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.