वणी /
तालुक्यातील राजुर येथील रुख्मिनी कोल वॉशरी ला महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड (MAHAGENCO) यांची ५० हजार टन कोल वॉश चे काम दिले आहे. परंतु रुख्मिनी कोल वॉशरी येथून 'कोल वॉश' च्या नावाखाली गोरखधंदा चालू आहे. कोल वॉश करुन ते फक्त महाजनको या कंपनीला ४०% कोळसा व ६०% डस्ट हे मिश्रण करुन रेल्वे डब्यांनी महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड (MAHAGENCO) या कंपनीला पाठवित आहे. व इतर वॉश केलेला कोळसा ते मार्केट मध्ये उच्च भावात विकुन महाजनको या कंपनीची फसवणूक करुन त्यांच्या पासून १००% कोळशाचा पैसा वसुल करीत आहे.
या होणाऱ्या भोंगळ कारभारावर आळा घालण्याकरीता व रुख्मिनी कोल वॉशरी ची योग्य तपासणी करुन योग्य ती कारवाई करण्याची मागणी जिल्हा कॉंग्रेस कमेटी अल्पसंख्याक विभागाचे वणी तालुका अध्यक्ष अरबाज अहेमद खान यांनी संबंधित विभाग, पोलिस विभाग यांच्याकडे केली. मात्र संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले असा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेतून केला .
गुरुवारी २० मार्च रोजी येथिल शासकीय विश्रामगृहात अरबाज अहेमद खान यांनी पत्रकार परिषद घेऊन सदरची माहिती दिली. तसेच सोमवारी संबंधित अधिकाऱ्यांविरोधात हायकोर्टात पिटीशन दाखल करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सात दिवसात कारवाई करण्यास असमर्थता दर्शविली तर त्यांच्या विरोधात न्यायालयात पिटीशन दाखल करु असा इशाराही पत्रकार परिषदेतून अरबाज अहेमद खान यांनी दिला आहे.