स्टिंग ऑपरेशन न्यूज/
राज्यात प्रतिबंधित तंबाकू व गुटखा तस्करीच्या विरोधात मोठ्या कारवाईत, यवतमाळ पोलिसांनी तेलंगणा- महाराष्ट्र सीमेवर गुजरातमधून तस्करी केल्या जाणाऱ्या तंबाखूची मोठी खेप जप्त केली आहे. यवतमाळ गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी 10 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता केलेल्या या कारवाईत पोलिसांनी 1 कोटी 34 लाख 51 हजार आठशे रुपये किमतीचे विविध ब्रँडचे फ्लेवरयुक्त तंबाखू आणि अशोक लेलँडचा ट्रक किं. (25 लाख) जप्त केला.
गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पथकाने मंगळवारी सायंकाळी पाच वाजता महाराष्ट्र तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या आरटीओ चेकपोस्टजवळ नाकाबंदी केली. वाहन तपासणीदरम्यान आदिलाबादकडून येणारा पांढऱ्या रंगाचा अशोक लेलँड कंटेनर क्रमांक जीजे -27 टीएफ- 0582 अडवला असता त्यात बाबा, माजा, होला व इतर ब्रँडचा प्रतिबंधित फ्लेवरचा तंबाखूची 290 पोती आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी ट्रकचालक अख्तरभाई अहमद मियाँ शेख (47) रा. गांधीनगर (गुजरात) याला ताब्यात घेतले. आरोपी ट्रकचालकाविरुद्ध पांढरकवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक पीयूष जगताप, उप विभागीय पोलिस अधिकारी पांढरकवडा रामेश्वर वेंजने, गुन्हे शाखा प्रमुख पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ चे एपीआई अजय कुमार वाढ़वे, हेड कांस्टेबल उल्हास कुरकुटे, सुनील खंडागळे, सुधीर पांडे, नायब कांस्टेबल सुधीर पीदुरकर, निलेश निमकर, कांस्टेबल रजनीकांत मडावी व चालक नरेश राउत यांनी केली.