वणी:-
प्रत्येक व्यक्तीला बदलत्या जगासोबत बदलता आल पाहिजे. कुठ थाबयचं हे कळलं की दुःखाचे प्रसंग कमी येतात. सकारात्मक विचारांकडे झुकल्याने प्रत्येकाला फायदा होतो. सकारात्मक विचार करून आचरणात आणल्याने जीवन सुखकर , सुसह्य व आनंदी होते. त्यामुळे जीवन जगताना आनंद हा सर्वात महत्त्वाचा आहे. असे प्रतिपादन येथील लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल च्या प्राचार्य चित्रा विवेक देशपांडे यांनी केले. त्या माझा गाव माझा वक्ता या व्याख्यानमालेत ' जीवन जगताना ' या विषयावर 38 वे पुष्प गुफतांना बोलत होत्या.
विदर्भ साहित्य संघ व नगर वाचनालय वणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या व्याख्यान पुष्पाच्या अध्यक्षस्थानी वि. सा. संघाचे वणी विभागाचे उपाध्यक्ष गजानन कासावार हे होते. प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव अशोक सोनटक्के हे होते.
आपला विषय मांडताना त्या पुढे म्हणाल्या की, आपण जीवन जगताना आनंद हरवून बसलो. आज आपण दुसऱ्यांच्या आनंदात दुःख शोधतो, पण आपल्याला दुःखात आनंद शोधता आला पाहिजे. तन आणि मन स्वस्थ ठेवायचे असेल तर आपल्याला जीवनातील आनंद शोधता आला पाहिजे. जीवनात आनंद वाटला की आनंद मिळतो. दुःख वाटलं की दुःख मिळते.
अध्यक्षीय समारोप करताना कासावार म्हणाले की, प्रत्येकानी जीवन जगताना आनंद शोधला पाहिजे हे खर आहे. पण जीवनाचे आपले अंतिम उद्दिष्ट हे आपल्या आत्म्याच परमात्याशी मिलन होण हा आहे. ते झाल्याने आपले जन्म मृत्यूचे फेरे बंद होतील. त्यामुळे हे प्राप्त करण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक सोनटक्के यांनी केले. सूत्रसंचालन सचिव प्रा. अभिजीत अणे यांनी केले. आभार प्रदर्शन सहसचिव राजेश महाकुलकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवेंद्र भाजीपाले, प्रमोद लोणारे, राम मेंगावार यांनी केले.