वणी :
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी मंगळवारी वणी येथे भव्य जाहीर सभा घेतली. पक्षाचे अधिकृत उमेदवार राजू उंबरकर यांच्या प्रचारार्थ विदर्भ दौऱ्यावर असताना ठाकरे यांनी ही दुसरी सभा घेतली, ज्यात हजारो लोकांनी उत्स्फूर्तपणे हजेरी लावली होती.
सभेच्या सुरुवातीला प्रास्ताविक नगरसेवक सचिन भोयर यांनी केले, तर सूत्रसंचालन हरीश कामारकर यांनी केले. यावेळी ठाकरे यांनी अत्यंत परखड भाषण केले, ज्यामध्ये त्यांनी महायुती आणि महाविकास आघाडी यांचे वाभाडे काढले. त्यांनी मतदारांना आवाहन केले की, आमदार निवडताना जात -पात, धर्म, पक्ष हे पाहण्याऐवजी उमेदवाराच्या कार्यक्षमता, समाजसेवा आणि जनसेवेच्या भावनांचा विचार करावा.
राज ठाकरे ते पुढे म्हणाले, "आजारी झाल्यावर तुम्ही डॉक्टरची जात पाहता का? तो आजार बरा करू शकतो का, हे पाहता का? मग आमदार निवडताना जातीचा विचार का करता? तुमच्यासाठी झटणारा, तुमच्या हितासाठी काम करणारा उमेदवार निवडा. राजू उंबरकरसारखा प्रामाणिक उमेदवार निवडा, जो तुमच्या गावात राहील आणि तुमच्यासाठी कायमस्वरूपी उपलब्ध असेल.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि सरकारी निष्काळजीपणाचे मुद्दे...
राज ठाकरे यांनी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांवर गंभीर चिंता व्यक्त केली. "यवतमाळ जिल्ह्याची ओळख पांढरं सोनं पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून नाही, तर शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या वाढत्या संख्येमुळे झाली आहे," असे ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या व्यथांची जाण नसलेल्या सत्ताधाऱ्यांना धारेवर धरताना त्यांनी पुढे सांगितले की, "जे लोक निवडून येतात, ते तुमच्या समस्या सोडवण्यासाठी नसून त्यांचे वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी येतात.
त्यांनी महायुती आणि महाविकास आघाडीच्या सरकारांवर टीका करताना सांगितले की, "शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत, स्त्रियांवर अत्याचार होत आहेत, आणि त्या वेळीही राजकीय पक्ष लोकांना फसवण्यासाठी पैशाचा वापर करतात. त्यांना खात्री आहे की, तुम्हाला वाईट वागवले तरी तुम्ही त्यांना परत निवडून द्याल. हा गैरसमज तुम्हाला मोडून काढावा लागेल, अन्यथा परिस्थितीत बदल होणार नाही असे राज ठाकरे म्हणाले.