शेतकऱ्यांसाठी तूर पिकाचे उत्पादन अधिक फायद्याचे - शेती मित्र डॉक्टर दिलीप अलोने


वणी :
उत्पादनक्षमता मागणी आणि बाजार भाव या तिन्हीचा विचार करता वर्तमान स्थितीत शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिक उत्पादन देणाऱ्या तूर पिकाचे उत्पादन घेणे अधिक फायद्याचे ठरेल, असे मत शेती मित्र व प्रयोगशील शेतकरी डॉक्टर दिलीप अलोने यांनी व्यक्त केले. नागपूर येथील ऍग्रो व्हिजन प्रदर्शनात शनिवारी दुपारच्या सत्रात तुरीचे अधिक उत्पादन या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी आयोजकांच्या वतीने त्यांना स्मृतीचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
सामान्यपणे शेतकरी तुरीकडे दुर्लक्षित पीक किंवा दुय्यम पीक म्हणून बघतात मात्र मुख्य पीक म्हणून त्याकडे लक्ष दिल्यास व योग्य व्यवस्थापन केले तर त्याचा फायदा शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी होऊ शकतो एकरी 20 क्विंटल पर्यंत तुरीची उत्पादनक्षमता आहे असा माझा शेतकरी म्हणून स्वानुभव आहे. असे सांगत बिजारोपणापासून काढणीपर्यंतचे संपूर्ण नियोजन कसे करावे ते सविस्तरपणे उपस्थित शेतकऱ्यांना पटवून दिले.
 कार्यशाळेत शेतकऱ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले. या कार्यशाळेत शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला होता. 

अधिक उत्पादनासाठी नवनवीन प्रयोग , योग्य जमिनीची निवड, अधिक उत्पादन क्षमता असलेल्या वाणाची निवड, आंतरमशागत खतांचे नियोजन, कीड व्यवस्थापन यावर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. गेल्या 25 वर्षापासून ते झरीजामणी तालुक्यातील पाटण या गावी आपल्या शेतीत तुरीचे उत्पादन घेत असून अधिक उत्पादनासाठी सातत्याने नवनवीन प्रयोग करीत असतात त्यासोबतच शेतकऱ्यांना मार्गदर्शनही करीत असतात. कापूस आणि सोयाबीन या पिकाच्या तुलनेत तूर उत्पादनाच्या खर्च तुलनेने कमी असून अधिक उत्पादनाची शाश्वती जास्त आहे तूर या कडधान्याची मागणी लक्षात घेता चांगले भाव मिळत असल्यामुळे या पिकात आर्थिक नफा अधिक आहे असेही डॉक्टर अलोने यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

Previous Post Next Post