वणी :-
धनत्रयोदशीला आरोग्याचे दैवत धन्वंतरीचा प्रगट दिन साजरा केला जातो. सुदृढ जिवनशैली व संपन्न आयुष्य जगण्याची दिशा देणाऱ्या आयुर्वेदाचा प्रसार व प्रचार व्हावा म्हणून आयुष मंत्रालयातर्फे यावर्षीपासून 101 देशांमधे आंतरराष्ट्रीय स्तरावर धनत्रयोदशीला "राष्ट्रीय आयुर्वेद दिवस" घोषित करुन साजरा केला आहे. त्या अनुषंगाने श्री विश्वयोग आयुर्वेद व पंचकर्म उपचार केंद्र येथे धनत्रयोदशीला विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड व अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य गजानन कासावार यांच्या शुभहस्ते धन्वंतरी पूजन करून
राष्ट्रीय आयुर्वेदिक दिन साजरा करण्यात आला.
निसर्गाच्या चक्राशी जुळवून घेणे म्हणजे आरोग्य संपन्न राहणे अशी मुलभूत संकल्पना असलेला आयुर्वेद शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक स्तरावर मानवी आरोग्य जपतो.
वणी शहरातील प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य वैद्य सुवर्णा चरपे यांच्याकडे धन्वंतरी पूजनानंतर लगेच त्यांनी स्वतः तयार केलेले कौस्तुभकांती उटणे, कौस्तुभकांती अभ्यंग तैल, कौस्तुभकांती केश्य तैल या तिन उत्पादनांचे स्वानंंद पुंड यांनी औषधीकलश अभिमंत्रोच्चारीत करुन शंखध्वनीमधे दिमाखदार प्रक्षेपण सोहळा संपन्न झाला.
वैद्यकीय व्यवसाय चतुष्पादांवर अवलंबून असतो. कुशल वैद्य, गुणकारी औषधे, चतुर, प्रसंगावधानी परिचारक व आज्ञाधारक रुग्ण हे ते चार पाय आहेत. चतुष्पादातील एक पाद म्हणजे परिचारक. या प्रसंगी उपचार केंद्रातील सेवाभावी परिचारिका सुनंदा शिलमनवार यांचा सन्मान भावना गंगमवार तर पंचकर्म थेरपिस्ट निखिल वाघाडे यांचा सन्मान स्वानंद पुंड यांच्या हस्ते करण्यात आला. वैद्य चरपे यांनी प्रक्षेपित औषधींचे गुण , कर्म विषद केले. तसेच सहा महिन्यात उपचार केंद्राद्वारे राबवलेल्या पंचकर्म चिकित्सा, शरदऋतूतील विरेचन उपचार, नवरात्रोत्सवातील स्त्रीयांचे आरोग्य तपासणी शिबिर,, कोजागिरीचे दम्याचे शिबिर, सुवर्ण प्राशन इत्यादी उपक्रमांची माहिती दिली.
याप्रसंगी गजानन कासावार, तारा कुळकर्णी, अमोल कुलकर्णी यांनी प्रसंगानुरूप प्रतिक्रिया व्यक्त केल्या. याप्रसंगी निलिमा काळे, हर्षदा शेंडे, गिता पांपट्टीवार, रजनी गारघाटे, वेदिका शेंडे , अशोक सोनटक्के, परशुराम पोटे, डॉ.अभिजित अणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.