जैताईच्या प्रांगणात प्रभात कीर्तनाचा रौप्यमहोत्सव संपन्न , मृण्मयी कुलकर्णी आणि नुपूर देशपांडे यांचे संयुक्त कीर्तन.

वणी :

          आपल्या आगळ्यावेगळ्या उपक्रमांसाठी सुप्रसिद्ध असणाऱ्या वणी येथील जैताई मंदिराच्या प्रांगणामध्ये देवस्थानच्या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम स्वरूपात सादर होत असलेल्या दीपावली प्रभातकालीन कीर्तनाचा रौप्य महोत्सव आज धनत्रयोदशीच्या पावन मुहूर्तावर, नागपूर येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प सौ मृण्मयी कुलकर्णी भाटवडेकर आणि त्यांच्या शिष्या ह.भ.प. सौ नुपूर देशपांडे यांच्या संयुक्त कीर्तनाने संपन्न झाला.
        प्रस्तावना करताना देवस्थानचे अध्यक्ष माधव सरपटवार यांनी कीर्तन केसरी भाऊसाहेब शेवाळकर, तुळसाबाई आणि दादाजी गोहणे, सरस्वतीबाई आणि गणपतराव बिलोरीया तथा स्व. नरेंद्र नगरवाला यांच्या स्मृत्यर्थ आयोजित होत असलेल्या या कीर्तन सेवेच्या २५ वर्षाचा इतिहास उलगडून दाखविला.
निष्ठावंत भाव |
भक्तांचा स्वधर्म ||
निर्धार हे वर्म |
चुकू नये ||
       या जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगावर निरूपण करताना खरा निष्ठावंत भक्त कसा असतो? याचे विवेचन करीत वारकऱ्यांचे जीवनात हे सूत्र कसे पाहता येते हे दोन्ही कीर्तनकारांनी विविध महापुरुषांच्या जीवनातील प्रसंगांच्या आणि विविध संत वचनांच्या आधारे सुस्पष्ट केले. 
        शिवराज्यातील शेतकरी, स्वयंसेवकांच्या घरी चहा घेणारे गोळवलकर गुरुजी अशा विविध छोट्या छोट्या कथांच्या माध्यमातून त्यांनी आपला प्रतिपाद्य विषय अधिक फुलविला. 
         हासत ये ! अंबे नाचत ये ! या गजराने मध्यंतर करण्यात आले.
         उत्तर रंगांमध्ये शिवछत्रपतींच्या राज्याभिषेक सोहळ्याला वर्णन करताना अगदी शिवपूर्व काळापासून आरंभ करीत, आई जिजाऊंचे डोहाळे, त्यांनी शिवरायांना दिलेले शिक्षण, दादोजी कोंडदेव आणि दिलेले शस्त्र, शास्त्र आणि नीतिमत्ता शिक्षण, विजापूरला गो हत्या करणाऱ्याचा शिवछत्रपतींनी हात उडवणे, कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा केलेला गौरव असे विविध प्रसंग वर्णन करीत शेवटी ये स्वराज्य सिंहासनी... ! या रोमांचकारी गीताच्या माध्यमातून शिवराज्याभिषेकाचा प्रसंग प्रत्यक्ष उभा केला. 
         सुयोग्य अभ्यास, शुद्ध उच्चारण, अस्खलित पाठांतर, आत्मविश्वास पूर्ण सादरीकरण, सध्याच्या परिस्थितीशी नाळ जुळवण्याचे सामाजिक भान अशा अनेक अंगाने कीर्तन सर्वांग सुंदर झाले. 
       संवादिनीवर अरुण दिवे तर तबल्यावर अभिलाश राजूरकर यांनी साथ संगत केली. विमलाबाई धोटे तथा लता पांडे यांनी कीर्तनकार यांचा सन्मान केला. लता पांडे आणि रचना उपाध्ये यांनी साकारलेल्या रंगावलीने देखील उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. पोद्दार टूर आणि ट्रॅव्हल्स च्या माध्यमातून सर्व उपस्थित त्यांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.
       वणीकर नागरिकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद कार्यक्रमाचे वैभव होता.

Post a Comment

Previous Post Next Post