वणी:
विद्यार्थ्यांमधील विविध कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांची सर्वांगीण प्रगती व्हावी या दृष्टीने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाद्वारे युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. त्यातील यशस्वी स्पर्धकांना विद्यापीठ प्रतिनिधी स्वरूपात अंतर्विद्यापीठीय स्पर्धेत सहभागी होण्याचा मान मिळतो. अशा विविध स्पर्धा प्रकारांपैकी राष्ट्रीय महिला विद्यार्थी संसद या विभागाच्या विद्यापीठाच्या चमूचे व्यवस्थापक म्हणून लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी येथील इंग्रजी विषयाचे अध्यापक तथा महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संयोजक डॉ. अभिजित अणे यांची विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संयोजक डॉ. राजीव बोरकर यांनी प्रकाशित केलेल्या प्रपत्रानुसार नियुक्ती करण्यात आलेली आहे.
त्यांच्यासोबत यवतमाळ येथील ब्रजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालयाच्या डॉ. मृणाल महाजन यांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे.
यांच्या मार्गदर्शनात आंतर विद्यापीठाय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कु. श्रावणी रोटे,कु. नफिसा शब्बीर हुसैन तथा कु. अरिफा शब्बीर हुसैन यांची तात्पुरत्या स्वरूपात निवड करण्यात आली असून कु. राधीका दंडे तथा कु. पूर्वा मानकर यांची राखीव सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
वणी सारख्या सुदूर आणि आदिवासी बहुल तालुका स्तरावरील महाविद्यालयातील प्राध्यापकाच्या या गौरवास्पद यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय मुकेवार यांच्या सह सर्व संचालक गण तथा प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.
विदर्भ साहित्य संघ शाखा वणीचे सचिव डॉ. अभिजित अणे हे वणीतील विविध शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमात अग्रेसर असल्याने विविध क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.