माझी वसुंधरा अभियान ४.०'चे निकाल जाहीर वणी नगर परिषदेला मिळाले ५० लाखांचे बक्षीस
वणी :
राज्य सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या 'माझी वसुंधरा अभियान ४.०' चे निकाल जाहीर झाले आहे. अमरावती विभागामधुन वणी नगर परिषदेने दुसरा क्रमांक पटकावला असुन ५० लाखांचे बक्षीस मिळविले आहे.राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी हे अभियान राबविण्यात येते. पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंच तत्त्वांवर आधारित 'माझी वसुंधरा अभियान' राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये दोन ऑक्टोबर २०२० पासून राबविण्यास सुरुवात झाली. माझी वसुंधरा अभियान ४.० हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एक एप्रिल २०२३ ते ३१ मे २०२४ कालावधीत राबविण्यात आले. यामध्ये राज्यातील ४१४ नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, तसेच २२ हजार २१८ ग्रामपंचायती अशी एकूण २२ हजार ६३२ स्थानिक स्वराज्य संस्थांनी सहभाग घेतला. माझी वसुंधरा अभियानाचा निकाल शासन निर्णयाद्वारे जाहीर करण्यात आला आहे."माझी वसुंधरा अभियान ४.०" मध्ये उच्चतम कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना बक्षीस रकमेचे वितरण करण्यात आले. त्यामध्ये ५० हजार ते ०१ लक्ष लोकसंख्या गटामध्ये अमरावती विभागामधून वणी नगर परिषदेने दुसरा क्रमांक पटकावून रु. ५० लक्ष बक्षीस प्राप्त केले आहे. घनकचरा, वृक्षारोपण, शहराचे वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी नगर परिषदेने केलेल्या कामाची दखल घेऊन, राज्य शासनाने माझी वसुंधरा अभियानात विभागामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या नगर परिषदेला पुरस्कार देऊन गौरव केला आहे. त्यामध्ये अमरावती विभागामधून वणी नगर परिषदेचा दुसरा क्रमांक असुन रु. ५० लक्ष बक्षीस प्राप्त झालेले आहे. सदर अभियानात नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी सचिन गाडे, उपमुख्याधिकारी जयंत सोनटक्के व शहर समन्वयक मयुर मुंदाने यांनी अथक परिश्रम घेतले.