प्रशासनाला अखेर जाग; मनसेच्या आंदोलनाला यश!, नांदेपेरा ते शेलू रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात; नूतनीकरणाचे लेखी आश्वासन

वणी : 

नांदेपेरा ते शेलू आणि नांदेपेरा ते रांगणा या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेत अखेर जिल्हा परिषद बांधकाम विभागाने कार्यवाही सुरू केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि शेलू ग्रामस्थांनी ७ ऑक्टोबर रोजी पुकारलेल्या आंदोलनानंतर नांदेपेरा ते शेलू रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात करण्यात आली असून, नूतनीकरणाचे लेखी आश्वासन देण्यात आले आहे.
रस्त्यांची दयनीय अवस्था आणि अपघातांचा वाढता धोका यामुळे विद्यार्थी, महिला, रुग्ण व प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. यापूर्वी ३ सप्टेंबर रोजी आंदोलन प्रस्तावित करण्यात आले होते. मात्र, प्रशासनाच्या आश्वासनानंतर ते स्थगित करण्यात आले. महिनाभरानंतरही काम सुरू न झाल्याने मनसेने पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला.
मनसे नेते राजू उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी उपअभियंता अनंत घोपे व इतर अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. त्यानंतर दुरुस्तीचे काम सुरू करून नूतनीकरण लवकर पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले. प्रशासनाच्या कार्यवाहीनंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
या आंदोलनामुळे रस्त्याचा प्रश्न मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली असून, शेलू, नांदेपेरा व रांगणा परिसरातील नागरिकांनी मनसेचे आभार मानले आहेत.
“जनतेच्या हक्कांसाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी मनसे सदैव लढा देईल. रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत आमचे त्यावर लक्ष राहील,” असे मनसे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post