वणी :
नगर वाचनालय, वणीच्या वतीने अभिजात मराठी भाषा दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी लोककलावंत व वक्ते डॉ. दिलीप अलोने यांनी ‘अभिजात मराठी भाषा’ या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान देत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
मराठी भाषेचा समृद्ध इतिहास, संत साहित्याची गौरवशाली परंपरा, मराठी भाषेची वैशिष्ट्ये तसेच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचे महत्त्व याबाबत डॉ. अलोने यांनी सोप्या व प्रभावी शैलीत माहिती दिली. मराठी भाषेचे जतन व संवर्धन करण्यासोबतच दैनंदिन व्यवहारात मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगर वाचनालयाचे सचिव गजानन कासावार यांनी केले. अरुणकुमार खैरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सुरेंद्र भाजीपाले, प्रमोद लोणारे व राम मेंगावर यांनी परिश्रम घेतले.