वणी :
गणेशोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन, स्वदेशी वस्तूंचा वापर आणि सामाजिक जनजागृतीचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचावा, तसेच गणेशोत्सव अधिक सुंदर, पर्यावरणपूरक आणि सामाजिक संदेश देणारा व्हावा, या उद्देशाने भारतीय जनता पार्टी, वणी शहरच्या वतीने **‘बाप्पा माझा स्पर्धा २०२६’**चे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत ‘अ’ गटात घरगुती गणपती, तर ‘ब’ गटात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येणार आहे. दोन्ही गटांतील स्पर्धकांनी स्वदेशी वस्तूंचा वापर किंवा पर्यावरण संवर्धन या दोन विषयांपैकी कोणत्याही एका विषयावर आकर्षक देखावा सादर करणे आवश्यक आहे.
दोन्ही गटांमध्ये प्रथम क्रमांकास ₹५,००० व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकास ₹३,००० व सन्मानचिन्ह, तर तृतीय क्रमांकास ₹२,००० व सन्मानचिन्ह देऊन विजेत्यांचा गौरव करण्यात येणार आहे.
१६ सप्टेंबरपर्यंत नोंदणी
स्पर्धकांनी दि. १६ सप्टेंबर २०२६पर्यंत आयोजकांनी दिलेल्या क्रमांकावर व्हॉट्सॲप किंवा फोनद्वारे नोंदणी करावी. नोंदणी करताना घराचा अथवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा संपूर्ण पत्ता आणि मोबाईल क्रमांक देणे आवश्यक आहे. नोंदणी केलेल्या देखाव्याचा फोटोही व्हॉट्सॲपद्वारे पाठवायचा आहे.
त्यानंतर दि. १७ ते २३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत आयोजक व परीक्षक प्रत्यक्ष घरी अथवा गणेशोत्सव मंडळाला भेट देऊन देखाव्याचे परीक्षण करणार आहेत. स्पर्धा वणी शहर व लगतच्या गावांपुरती मर्यादित राहणार आहे. घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव या दोन्ही गटांमधील निवड झालेल्या प्रत्येकी २० नोंदणींचे परीक्षण करण्यात येणार आहे.
इच्छुक स्पर्धकांनी शक्यतो सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत पोस्टरवर दिलेल्या क्रमांकावर व्हॉट्सॲप अथवा फोनद्वारे संपर्क साधावा. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
या अभिनव उपक्रमात वणी शहरातील नागरिक, गणेशभक्त आणि गणेशोत्सव मंडळांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन पर्यावरण संवर्धन आणि स्वदेशीचा संदेश समाजापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार आणि ॲड. निलेश माया महादेवराव चौधरी, शहर अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी वणी यांनी केले आहे.
स्पर्धेचे संयोजक मनोज सरमुकदम असून सहसंयोजक म्हणून गणेश आसूटकर, बालाजी भेदोडकर, उमेश गंधारे, डॉ. सौ. नीलिमा दवणे, श्रीमती वैशाली वातिले, सौ. आरती गणेश वांढरे, सौ. संगीता मेश्राम, सौ. प्रिती बिडकर आणि सौ. पूजा रामगिरवार कार्यरत आहेत.