धारदार हत्याराने तरुणावर जीवघेणा हल्ला; शास्त्रीनगर परिसरात खळबळ , पोट व कमरेवर वार, चंद्रपूर येथे उपचार सुरू

वणी :

शहरातील शास्त्रीनगर परिसरात जुन्या वादातून एका तरुणावर धारदार हत्याराने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना १० सप्टेंबरच्या रात्री घडली. संतोष पुंडलिक कोरवते असे जखमी तरुणाचे नाव असून, त्याच्यावर पोटाच्या डाव्या बाजूस तसेच कमरेवर धारदार कातीने वार करण्यात आल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी अवस्थेत त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, १० सप्टेंबर रोजी रात्री दीपक चौपाटी परिसरातील सलीम चिकन सेंटर येथे संतोष कोरवते उपस्थित होता. त्यावेळी त्याचे परिचित आसिफ शेख व राहुल मत्ते हे एका वयोवृद्ध व्यक्तीची थट्टा-मस्करी करून त्याला त्रास देत असल्याचे संतोषच्या निदर्शनास आले. त्याने दोघांना वृद्ध व्यक्तीला त्रास देऊ नका, असे सांगितले. यावरून त्यांच्यात बाचाबाची झाली. शिवीगाळही झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. वाद वाढू नये म्हणून संतोष तेथून निघून गेला.
यानंतर रात्री सुमारे ११.१५ वाजताच्या सुमारास संतोष मोटारसायकलने घरी जात असताना के.जी.एन. अँक्वासमोर झेंडा चौकात त्याला अडविण्यात आले. यावेळी आसिफ शेख याच्यासह जिगर आसु शेख, राहुल मारोती मत्ते आणि अच्छु शब्बीर शाह हे तेथे उपस्थित होते, असे तक्रारीत नमूद आहे.
आसिफ शेख याने काही वेळापूर्वी झालेल्या वादाचा जाब विचारला. त्यानंतर अचानक संतोषवर धारदार कातीने पोटाच्या डाव्या बाजूस वार करण्यात आला. तसेच कमरेवरही वार केल्याचा आरोप आहे. संतोषने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता जिगर शेख याने त्याला मोटारसायकलवरून खाली ओढून हातबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. राहुल मत्ते आणि अच्छु शब्बीर शाह यांनीही मारहाण व शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.
दरम्यान, घटनास्थळी नागरिकांची गर्दी जमू लागल्याने चौघांनी तेथून पळ काढल्याचे तक्रारीत नमूद आहे. जखमी संतोषला त्याचा भाऊ महादेव पुंडलिक कोरवते याने तातडीने सुगम हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र जखमा गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालय, चंद्रपूर येथे रेफर केले.
या प्रकरणी महादेव पुंडलिक कोरवते यांनी वणी पोलिस ठाण्यात जबानी रिपोर्ट दाखल केला आहे. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संबंधित संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती आहे.
या हल्ल्यामागील नेमका कारण काय, तसेच हा हल्ला पूर्वनियोजित होता का, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली विजय वानखडे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post