वणी :
ढोल-ताशांचा गजर, आकर्षक पद्धतीने सजवलेले नंदीबैल, बालगोपाळांचा उत्साह आणि बक्षिसांच्या प्रतीक्षेने रंगलेले शासकीय मैदान… अशा उत्साहपूर्ण वातावरणात शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आयोजित भव्य तान्हा पोळा शनिवारी, १२ सप्टेंबर रोजी वणी येथील शासकीय मैदानावर उत्साहात पार पडला. शिवसेना जिल्हा संघटक विजय बाबू चोरडिया यांच्या संकल्पनेतून आयोजित या तान्हा पोळ्याला बालगोपाळांसह पालक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यंदाच्या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते तब्बल २७ सायकलींसह विविध आकर्षक बक्षिसे. स्पर्धेत एकूण ३५६ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.
पावसाळी वातावरणाची तमा न बाळगता हजारो नागरिकांनी शासकीय मैदानावर गर्दी केली होती. बालगोपाळांनी आपल्या कल्पकतेने नंदीबैलांची केलेली आकर्षक सजावट तसेच विविध कलाविष्कारांचे सादरीकरण उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. प्रत्येक बालकाच्या सादरीकरणातून उत्साह, सर्जनशीलता आणि कलागुणांची झलक पाहायला मिळाली.
चार गटांत रंगली चुरशीची स्पर्धा
तान्हा पोळा स्पर्धेचे चार वेगवेगळे गट करण्यात आले होते. प्रत्येक गटातील बालकांनी नंदीबैलांची आकर्षक सजावट आणि कल्पक सादरीकरण करत स्पर्धेत रंगत आणली. मैदानावर एकापेक्षा एक सरस सादरीकरण होत असल्याने विजेत्यांची निवड करताना परीक्षकांसमोरही मोठे आव्हान निर्माण झाले.
२७ सायकली ठरल्या प्रमुख आकर्षण
बालगोपाळांचा उत्साह वाढविण्यासाठी आयोजकांकडून मोठ्या प्रमाणात आकर्षक बक्षिसांची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामध्ये २७ सायकली हे यंदाच्या तान्हा पोळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले. विजेत्या बालकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे व सन्मानचिन्हे देऊन गौरविण्यात आले.
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. मात्र, बालगोपाळांचा उत्साह आणि त्यांच्या कलाविष्कारांची उत्सुकता यामुळे नागरिकांची पावले शासकीय मैदानाकडे वळली. पालकांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बालकांच्या सादरीकरणाला टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
बालकांच्या कल्पकतेला व्यासपीठ देण्याचा प्रयत्न
बालकांना केवळ स्पर्धेपुरते मर्यादित न ठेवता त्यांच्या कल्पकतेला आणि सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजक विजय बाबू चोरडिया यांनी सांगितले. अशा उपक्रमांमुळे बालकांचा आत्मविश्वास वाढतो, त्यांच्यामध्ये निरोगी स्पर्धेची भावना निर्माण होते आणि भविष्यातील वाटचालीसाठी त्यांना प्रेरणा मिळते, असेही चोरडिया यांनी नमूद केले.
कार्यक्रमादरम्यान ॲड. कुणाल चोरडिया आणि सौ. ख्याती चोरडिया तसेच शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणारे परीक्षक, पालक, बालक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांचे ॲड. कुणाल चोरडिया यांनी आभार मानले.