वणी :
रस्त्यावर खड्डे पडले की प्रशासनाकडे तक्रारी, निवेदने आणि आश्वासनांचा नेहमीचा सिलसिला सुरू होतो. मात्र, पिंपरी ते बाबापूर रस्त्याच्या बाबतीत काहीसे वेगळे चित्र पाहायला मिळाले. नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन शिवसेनेचे जिल्हा संघटक विजय चोरडिया यांनी पुढाकार घेत स्वखर्चातून रस्त्यावरील खड्डे बुजवून मार्ग सुकर केला.
पिंपरी-बाबापूर रस्त्याच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधत युवा नेते शुभम गोरे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्यानंतर विजय चोरडिया यांच्या पुढाकारातून पिंपरी-बाबापूर मार्गावरील खड्ड्यांची डागडुजी करण्यात आली.
पिंपरी-बाबापूर मार्ग हा परिसरातील नागरिकांसाठी तसेच ‘नवसाला पावणाऱ्या गणपती’च्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाचा मार्ग आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांसह भाविकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते.
गणपतीच्या दर्शनासाठी ये-जा करणाऱ्या भाविकांची गैरसोय लक्षात घेऊन रस्त्याची डागडुजी करण्यात आली. खड्डे बुजविल्याने भाविकांचा प्रवास अधिक सुखकर झाला असून, वाहनधारकांनाही दिलासा मिळाला आहे.
रस्त्याच्या प्रश्नावर केवळ आश्वासनांवर समाधान न मानता प्रत्यक्ष काम करण्याचा प्रयत्न विजय चोरडिया यांनी केला आहे. स्वखर्चातून करण्यात आलेल्या या कामामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
पिंपरी-बाबापूर मार्गावरील डागडुजीमुळे गणपती भक्तांसह परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला असून, प्रवास अधिक सोयीचा झाला आहे.