पिकांना पाणी देण्याच्या हंगामात कृषी पंपांच्या केबल चोरीने शेतकरी त्रस्त , वणी तालुक्यात शेतशिवारात चोरट्यांचा धुमाकूळ; उमरीत दोन शेतकऱ्यांचे हजारोंचे नुकसान

वणी : 

वणी तालुक्यातील शेतशिवारात कृषी पंपांच्या कॉपर केबल, मोटारी तसेच सौरपंपांच्या वायर चोरी करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. ऐन पिकांना पाणी देण्याच्या हंगामात रात्री किंवा पहाटेच्या वेळी चोरटे शेतात घुसून कृषी पंपांच्या केबल कापून लंपास करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे आर्थिक नुकसान होत असून, वेळेवर पाणी न मिळाल्याने पिके वाळण्याचा धोका निर्माण झाला आहे.
तालुक्यातील उमरी येथील गजानन वारलु माथनकर (६०) यांच्या गट क्रमांक १३ मधील शेतातील बोअरमधून कृषी पंपाला जोडलेली सुमारे २०० ते २५० फूट केबल चोरट्यांनी कापून लंपास केली. चोरट्यांनी मोटार पंप बोअरमध्येच सोडून दिला. या घटनेत माथनकर यांचे जवळपास ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.
तसेच भाऊराव निळकंठ पिंपळकर (६२), रा. उमरी यांच्या शेतातील सुमारे २०० फूट केबलही चोरट्यांनी कापून नेल्याचे समोर आले आहे. या दोन्ही घटनांबाबत वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती गजानन माथनकर व भाऊराव पिंपळकर यांनी दिली.
सध्या शेतांमध्ये पिकांना पाणी देण्याचे काम सुरू असताना कृषी पंपांच्या केबल चोरीच्या घटना वाढल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण होत आहे. केबल चोरीमुळे पाणीपुरवठा खंडित होत असून, पुन्हा नवीन केबल खरेदी व दुरुस्तीचा अतिरिक्त आर्थिक भार शेतकऱ्यांवर पडत आहे.
शेतशिवारातील चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post