गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करा : मराठी विज्ञान परिषदेचे आवाहन, मातीच्या मूर्तीला प्राधान्य द्या; प्लास्टर ऑफ पॅरिस, थर्माकोल व प्लास्टिकचा वापर टाळा

वणी :

मराठी विज्ञान परिषद, वणी विभागाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त जनजागृती अभियान राबविण्यात येत असून, गणेशोत्सव पर्यावरणपूरक व विज्ञाननिष्ठ पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याच अनुषंगाने ‘गणेशोत्सव जनजागृती भाग-१’ अंतर्गत नागरिकांना पर्यावरण संवर्धनाबाबत विविध सूचना करण्यात आल्या आहेत.
भारतीय संस्कृतीतील सण-उत्सव हे सामाजिक समरसता, परस्परावलंबन, विविधतेतील एकता आणि सामाजिक सौहार्द वृद्धिंगत करणारे आहेत. प्रत्येक सण विज्ञान व पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याची परंपरा जोपासणे आवश्यक असल्याचे परिषदेने म्हटले आहे. श्रीगणेश बुद्धीची देवता असून अग्रपूजेचा मानकरी आहे. त्यामुळे गणेशोत्सव हा केवळ उत्सव न राहता संस्काराचा महोत्सव ठरावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मातीच्या गणेशमूर्तीला द्या प्राधान्य

गणेशमूर्तीसाठी मातीचा वापर करावा. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती सहज विघटनशील नसल्याने तसेच त्यावरील रासायनिक रंगांमुळे जलप्रदूषणाचा धोका वाढतो. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी मातीच्या मूर्तीचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

घरच्या घरी गणेशमूर्तीचे विसर्जन करा

नदी, तलाव किंवा जलस्रोतांमध्ये मूर्ती विसर्जित केल्याने पाणी प्रदूषित होण्याची शक्यता असते. त्यामुळे श्रीगणेशाची उत्तरपूजा करून मोठ्या भांड्यात घरीच मूर्ती विसर्जित करावी. विसर्जनानंतर उरलेले पाणी झाडांना वापरावे, तर तळाशी जमा झालेली माती कुंडीत भरून त्यात फळझाड किंवा फुलझाड लावावे. अशा प्रकारे पर्यावरणपूरक विसर्जनातून गणेशाचे स्मरण कायम ठेवता येईल, असा संदेश देण्यात आला आहे.

गौरी विसर्जनही पर्यावरणपूरक पद्धतीने

हरतालिका व गौरी पूजनानंतर गौरीचे विसर्जनही शक्यतो घरच्या घरीच करून पर्यावरणाचे संरक्षण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
निर्माल्य व्यवस्थापनातून रोखा रोगांची लागण
निर्माल्य पाण्यात कुजल्याने रोगजंतूंची निर्मिती होऊ शकते. त्यामुळे विविध संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. यासाठी निर्माल्य घरच्या घरी खड्ड्यात टाकून त्यापासून कंपोस्ट खत तयार करावे आणि हे खत झाडांसाठी वापरावे, अशी सूचना करण्यात आली आहे. श्री महालक्ष्मी पूजनावेळी ज्या पद्धतीने निर्माल्य व इतर जैविक कचऱ्याचे व्यवस्थापन केले जाते, त्याच पद्धतीचा अवलंब गणेशोत्सवातही करता येईल, असे परिषदेने स्पष्ट केले.

ध्वनी प्रदूषण टाळण्याचे आवाहन

मोठ्या आवाजातील डीजे व ध्वनिवर्धकांमुळे वृद्धांना त्रास होण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम, श्रवणशक्तीवर विपरीत परिणाम तसेच रक्तदाब व हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. त्यामुळे गणेशोत्सवात ध्वनी प्रदूषण टाळून शांततामय वातावरण राखावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

थर्माकोल, प्लास्टिकऐवजी नैसर्गिक सजावटीचा वापर

मखर व सजावटीसाठी थर्माकोल आणि प्लास्टिकचा वापर टाळावा. त्याऐवजी शोभिवंत झाडे, रंगीबेरंगी फुले, हळद, ड्रायफ्रूट्स, रंगीत कागद, कापड, धान्य व डाळी यांसारख्या नैसर्गिक साधनांचा वापर करून आकर्षक सजावट करावी, असे परिषदेने सुचविले आहे.
‘जेव्हा होईल गणपती एक विचारधारा, तेव्हाच होईल समृद्ध संसार सारा’ या संदेशातून पर्यावरण संरक्षणाची जाणीव प्रत्येक नागरिकाने ठेवावी. अज्ञानाने किंवा नकळत होणारे हवा, पाणी व ध्वनी प्रदूषण सर्व सजीवांसाठी धोकादायक आहे. त्यामुळे ‘जगा आणि जगू द्या’ या निसर्गनियमाचे पालन करणे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गणेशोत्सवात किंवा तत्पूर्वी वरील विषयांवर मोफत विज्ञान प्रवचनासाठी संपर्क साधावा, असेही मराठी विज्ञान परिषद, वणी विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

संपर्क : प्रा. महादेव खाडे (अध्यक्ष) – ८२७५२९७२११, प्रशांत गोडे – ९७६३३०६९९७, लक्ष्मण इद्दे – ८२७५२९९८९६, भारत गारघाटे – ९४२००४५९९४, संजय देवाळकर – ८३२९२७४३०८, नेताजी पारखी – ९४२३६५३२९० तसेच मराठी विज्ञान परिषदेचे सर्व सदस्य.

Post a Comment

Previous Post Next Post