वणी :
पोळा उत्सव समितीच्या वतीने शासकीय मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या पोळा उत्सवाला शेतकरी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पावसाने दडी मारल्यानंतरही शेतकऱ्यांनी आपल्या बैलजोड्या आकर्षक पद्धतीने सजवून मोठ्या उत्साहात उत्सवात सहभाग घेतला. विविध प्रकारच्या सजावटींमुळे सर्जा-राजा लक्षवेधी ठरला होता. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्सवाचा उत्साह स्पष्टपणे दिसून येत होता.
या उत्सवात बैलजोडी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेतील विजेत्यांना शिवसेनेचे जिल्हा संघटक विजय चोरेडिया यांच्या हस्ते अनुक्रमे ३१००, २१०० व ११०० रुपयांचे रोख बक्षीस देण्यात आले. तसेच उत्सवात सहभागी झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला गोड पदार्थ व लाडू देऊन, गळ्यात दुपट्टा टाकून सन्मान करण्यात आला.
विधिवत बैलजोडी पूजन कार्यक्रमाला शिवसेनेचे जिल्हा संघटक विजय चोरडिया, माजी आमदार संजीव रेड्डी बोदकूरवार, माजी पोलीस पाटील नितीन शिरभाते यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते बैलजोडीधारकांना बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शेतकरी बांधवांना पोळा सणाच्या शुभेच्छा देत त्यांच्या कष्टांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे संचालन पोळा उत्सव समितीचे सागर मुने यांनी केले. अमित उपाध्ये यांनी कार्यक्रमाची व्यवस्था सांभाळली, तर आभार अॅड. प्रवीण पाठक यांनी मानले.