वणी :
वणी तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार रामचंद्र बापुराव खिरेकर यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित सत्कार सोहळा २ जुलै रोजी सायंकाळी वणी येथील धनोजे कुणबी हॉलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. महसूल विभागात प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि लोकाभिमुख अधिकारी म्हणून ओळख असलेल्या श्री. खिरेकर यांच्यावर यावेळी शुभेच्छांचा वर्षाव झाला.
तलाठी म्हणून कारकिर्दीची सुरुवात करून मंडळ अधिकारी आणि त्यानंतर नायब तहसीलदार पदापर्यंतचा यशस्वी प्रवास करणाऱ्या श्री. खिरेकर यांनी आपल्या उल्लेखनीय कार्यामुळे वणी, मारेगाव व झरीजामणी तालुक्यात आदर्श अधिकारी म्हणून वेगळी ओळख निर्माण केली. सौजन्यशील, मनमिळाऊ आणि प्रेमळ स्वभाव, प्रभावी कार्यशैली तसेच मार्गदर्शक व्यक्तिमत्त्वामुळे त्यांनी सहकारी, अधिकारी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या मनात विशेष स्थान मिळवले. विशेषतः वणी तालुक्यातील जवळपास ६५०० गोरगरीब व निराधार नागरिकांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.
कार्यक्रमात श्री. रामचंद्र खिरेकर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, उप विभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, वणी, मारेगाव झरीजामणी चे तहसीलदार, निखिल धुळधर, उत्तम निलावाड, अक्षय रासने,माजी सभापती संजय पिंपळशेंडे, मुख्याधिकारी सचिन गाडे, उपमुख्याधिकारी जयंत सोनटक्के, नायब तहसीलदार विवेक पांडे, उल्हास निमेकर,प्रमोद वासेकर,यांच्यासह सर्व कार्यालयीन कर्मचारी, तलाठी, कोतवाल, सरकारी स्वस्त धान्यदुकानदार,अनेक अधिकारी, मित्रपरिवार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात श्री. खिरेकर यांच्या प्रामाणिक सेवाभाव, कार्यतत्परता आणि लोकाभिमुख कार्याचा गौरव केला. तसेच त्यांच्या पुढील आयुष्यास निरोगी, आनंदी, समृद्ध आणि दीर्घायुष्य लाभावे तसेच समाजसेवा व जनहिताचे कार्य यापुढेही अशाच उत्साहाने सुरू राहावे, अशा मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या.न्युज मिडिया पत्रकार असोसिएशन तर्फे शुभेच्छा!