वणी :
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) स्थापना दिनानिमित्त वणी तालुक्यातील दहावी व बारावीच्या परीक्षेत प्रत्येक शाळेत सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या पाच गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक व शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वणी पंचायत समितीचे सभापती तथा ब्लॅक डायमंड स्कूलचे संचालक संजय पिंपळशेंडे होते. प्रमुख वक्ते म्हणून यवतमाळ अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. नितीन खर्चे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून वणी नगर परिषदेचे प्रशासन अधिकारी गजानन कासावार उपस्थित होते. तसेच अभाविप वणी शाखेचे उपाध्यक्ष चैतन्य तुरुविले व नगरमंत्री आयुषी पुलेनवार व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रास्ताविकात गजानन कासावार यांनी विद्यार्थ्यांचा सन्मान हा गुणवत्तेचा गौरव असून अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना अधिक मेहनत घेण्याची प्रेरणा मिळते, असे सांगितले. विद्यार्थ्यांच्या संघटनेने गुणवंतांचा सन्मान करणे ही कौतुकास्पद बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले.
प्रमुख वक्ते डॉ. नितीन खर्चे यांनी अभाविपच्या कार्याचा आढावा घेताना राष्ट्रपुनर्निर्माणात विद्यार्थी परिषदेचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. योगशास्त्र हा भारताचा अमूल्य ठेवा असून त्याचे महत्त्व जगाने स्वीकारल्यानंतर आपणही त्याकडे नव्या दृष्टीने पाहू लागलो, असे ते म्हणाले.
देशाच्या सुरक्षेशी संबंधित विविध प्रश्नांवर अभाविपने सातत्याने भूमिका घेतली असून बांगलादेशी घुसखोरीविरोधातील आंदोलन, जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटविण्याची मागणी तसेच १९९० मध्ये श्रीनगरच्या लाल चौकात अभाविप कार्यकर्त्यांनी तिरंगा फडकावून दिलेला राष्ट्रभक्तीचा संदेश यांचा त्यांनी उल्लेख केला.
शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार व अनियमिततेविरोधात अभाविपने वेळोवेळी आवाज उठविला असून भारतीय ज्ञानपरंपरेचा विद्यार्थ्यांना परिचय करून देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. तंत्रशिक्षण, कृषी, वैद्यकीय, औषधनिर्माण, आदिवासी विद्यार्थी तसेच सेवा क्षेत्रात विविध प्रकल्पांद्वारे कार्य सुरू असून राष्ट्रभक्त, चारित्र्यसंपन्न व समाजाभिमुख युवक घडविणे हेच अभाविपचे ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अध्यक्षीय समारोपात संजय पिंपळशेंडे यांनी समाजाला दिशा देणारे बुद्धिमान, संस्कारक्षम व जबाबदार विद्यार्थी घडणे ही काळाची गरज असल्याचे सांगत, अभाविप या दिशेने प्रभावी कार्य करत असल्याचे मत व्यक्त केले.