वणी :
वणी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या एका अनोळखी वृद्ध व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वणी पोलीस स्टेशनमध्ये मर्ग क्रमांक ३९/२०२६ नोंद करण्यात आला असून मृत व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध सुरू आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २६ मे २०२६ रोजी सायंकाळी ४.५५ वाजताच्या सुमारास अंदाजे ६० वर्षीय अनोळखी पुरुषास उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय वणी येथे दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याबाबतचा एम.एल.सी. अहवाल वणी पोलीस स्टेशनला प्राप्त झाला आहे.
मृत व्यक्तीचे वर्णन असे आहे की, वय अंदाजे ६० वर्षे, बांधा सडपातळ, उंची सुमारे ५ फूट ६ इंच, केस पांढरे, फ्रेंच कट पांढरी दाढी, जाड काळी मिशी असून उजव्या हातावर “सुभाष” असे गोंदलेले आहे. अंगात पांढऱ्या रंगाचे ठिपके असलेला फुल शर्ट, आतमध्ये पांढरे टी-शर्ट आणि आर्मी रंगाची पॅन्ट परिधान केलेली होती.
सदर वर्णनाच्या व्यक्तीबाबत कोणाला माहिती असल्यास किंवा संबंधित नातेवाईक आढळल्यास त्यांनी तात्काळ वणी पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांनी केले आहे.
संपर्क :
पो.नि. गोपाल उंबरकर – ८७८८५७७८४०
मपोहेकॉ/ अंजली चिखले – ९५४५५४०६१४