वणी :
वणी पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याने दाखवलेल्या प्रामाणिकपणा आणि तत्परतेमुळे हिंगणा येथील एका महिलेला तिची हरवलेली पैशांची बॅग सुखरूप परत मिळाली. या घटनेमुळे वणी पोलिसांबद्दल नागरिकांमध्ये विश्वास अधिक दृढ झाला असून पोलीस शिपाई रितेश यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आज दि. २४ मे २०२६ रोजी दुपारी अंदाजे १.३० वाजताच्या सुमारास पूजा वीरू राऊत (वय २८, रा. टाकडघाट, ता. हिंगणा) या वणी बस स्थानकावर आल्या होत्या. यावेळी गडबडीत त्यांची हँडबॅग बस स्थानक परिसरात हरवली. सदर बॅगमध्ये महत्त्वाची कागदपत्रे तसेच रोख रक्कम होती. बॅग हरवल्याचे लक्षात येताच त्यांनी परिसरात शोधाशोध केली, मात्र बॅग मिळून आली नाही.
दरम्यान, कर्तव्यावर असलेले वणी पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई ब.नं. १६९९ रितेश यांना सदर बॅग बेवारस अवस्थेत आढळून आली. त्यांनी तत्काळ बॅगची पाहणी केली असता त्यात रोख रक्कम व आवश्यक कागदपत्रे असल्याचे निदर्शनास आले. यानंतर त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देत बॅगेच्या मालकाचा शोध सुरू केला.
काही वेळातच पूजा राऊत यांचा शोध लागल्यानंतर बॅगेतील वस्तू आणि रकमेची खातरजमा करून पोलीस शिपाई रितेश यांनी सदर बॅग त्यांच्याकडे सुपूर्द केली.