पदाधिकाऱ्यांविना ग्रामपंचायती ठप्प; वणी तालुक्यात प्रशासनाचा बोजवारा

वणी : प्रतिनिधी

वणी तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर गाव प्रशासनावर विपरीत परिणाम होत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. पदाधिकारी नसल्यामुळे निर्णय प्रक्रियेला खीळ बसली असून विकासकामांना अक्षरशः ब्रेक लागल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
यातच ग्रामसेवकांकडून गावाकडे होत असलेल्या दुर्लक्षाबाबत ग्रामस्थांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर तातडीने तोडगा काढणे ही जबाबदारी असतानाही अनेक ग्रामसेवक गावात क्वचितच दिसत असल्याची तक्रार करण्यात येत आहे.
पाणीपुरवठा, स्वच्छता, कर वसुली तसेच स्ट्रीट लाईटच्या लाखो रुपयांच्या बिलांमुळे आर्थिक भार वाढत आहे. विशेष म्हणजे दिवसा देखील स्ट्रीट लाईट सुरू असल्याने प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीतही अडथळे निर्माण झाले असून साध्या कामांसाठी ग्रामस्थांना पंचायत कार्यालयाच्या वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत.
पदाधिकारी नसल्याने प्रशासनाचा ताळमेळ पूर्णपणे बिघडल्याचे दिसत असून त्याचा थेट परिणाम गावाच्या दैनंदिन कामकाजावर होत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देऊन ग्रामसेवकांना नियमित गावात उपस्थित राहण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, नवीन निवडणुका होईपर्यंत माजी सरपंच व उपसरपंच यांची प्रशासक म्हणून नेमणूक करावी किंवा तातडीने ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर करून प्रशासन सुरळीत करावे, अशी ठाम मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post