वणी-वरोरा मार्गावर भीषण अपघात; दोन ठार, दोन गंभीर , भरधाव ‘स्विफ्ट’ची दुचाकीला धडक; पाटाळा पुलाजवळ हृदयद्रावक घटना

वणी : प्रतिनिधी

वणी-वरोरा राज्यमार्गावर बुधवारी दुपारी एक काळजाचा थरकाप उडवणारा भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने दोन जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, वांजरी (ता. वणी) येथील बांधकाम कामगार प्रदीप रमेश ठमके (वय ३१) हे आपल्या ‘स्प्लेंडर’ दुचाकीने (क्र. MH 29 B 0963) सहकारी अनिल बाबाराव कुत्तरमारे (वय ४०, रा. मानकी) यांच्यासह शेंबळ गावाकडे जात होते. दुपारी सुमारे १२:१५ वाजता पाटाळा पुलाजवळ मागून येणाऱ्या सिल्व्हर रंगाच्या ‘स्विफ्ट’ कारने (क्र. MH 14 GD 6835) त्यांच्या दुचाकीला भीषण धडक दिली.
धडक इतकी जबरदस्त होती की अनिल कुत्तरमारे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर प्रदीप ठमके गंभीर जखमी झाले. धडकेनंतर कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्याखाली जाऊन ३ ते ४ पलट्या घेत शेतात कोसळली.
जखमी प्रदीप ठमके यांना तातडीने वरोरा येथील रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अनिल कुत्तरमारे यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन लहान मुले व एक मुलगी असा परिवार आहे.
कारमधील इतर दोन प्रवासी गंभीर जखमी असून त्यांच्यावर वरोरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे जखमी मारेगाव येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. अनिल कुत्तरमारे यांचा मृतदेह रुग्णवाहिकेद्वारे वणी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला, तर कारमधील जखमींना टोल प्लाझाच्या रुग्णवाहिकेतून वरोरा येथे हलवण्यात आले.
दरम्यान, वणी पोलीस या घटनेचा पुढील तपास करत असून कारमधील प्रवाशांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post